Breaking News

विद्यार्थ्यांनी उच्च ध्येयाप्रती शिक्षणात सैराट व्हावे : पुष्पाताई पाटील

। भागवत इंग्लिश क्लासेसच्या गुणवंतांचा सत्कार

अहमदनगर, दि. 11 - शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये देशाचे भवितव्य घडते, असे म्हटले जाते. परंतु, सध्या शाळा या व्यवसाय केंद्र बनत चालल्याने खासगी क्लासेस गरज बनत चालली आहे. त्यामुळे खासगी क्लास घेणार्‍यांसमोर अध्यापनाबरोबरच राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे संस्कारी विद्यार्थी घडविण्याचे आव्हान आहे. विद्यार्थ्यांनीही फक्त परीक्षेतील गुणांसाठी अभ्यास न करता चारित्र्यसंपन्न नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाने उच्च ध्येय समोर ठेवून त्या ध्येयासाठी सैराट व्हायला हवे, असे प्रतिपादन दापोली येथील ज्येष्ठ लेखिका पुष्पाताई पाटील यांनी केले. 
नगरमधील संगिता सतिष भागवत संचालित भागवत इंग्लिश क्लासेसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रावसाहेब पटवर्धन स्मारकात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून पाटील यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. पाटील यांचे विद्यार्थी देवो भव: हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात गाजलेले आहे. भागवत इंग्लिश क्लासेसमधील इयत्ता 9 वी व 10 वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात उत्तम गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुमार शेटे, सतिष भागवत, संगिता भागवत उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाल्या, क्रमिक शिक्षणाबरोबरच देशाप्रती प्रेम असलेले व राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे विद्यार्थी घडवणे हे आजच्या शिक्षकांसमोरील आव्हान आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने प्रोत्साहन दिले पाहिजे. या कार्यक्रमात विद्यार्थी तसेच पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करीत क्लासमध्ये शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षणही मिळत असल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी कुमार शेटे यांच्यावतीने क्लासमधील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. क्लासचे गुणवंत विद्यार्थी साहिल मंडलिक, सुरभी पाठक, श्रेयस देशमुख, निलेश काटकर, श्रुती शाह, शिवम काजवे, निकिता देशमुख, संकेत कराळे, अनिकेत मैड, पियुष शिंदे, आम्रपाली आंधळे, गायत्री क्षोत्री, प्रार्थना रानडे आदींचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.