Breaking News

कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पांचा लवकरच विस्तार

मुंबई, दि. 15 - विरार-बोळींज, वेंगुर्ला, मिरा रोड आदी भागांत म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे गृहप्रकल्प उभारले जात असून, लवकरच या गृहप्रकल्पांचा विस्तार  मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) करण्यासाठी कोकण मंडळाने कंबर कसली आहे.
ठाणे, पनवेल, कल्याण आदी परिसरातही परवडणा-या दरात गृहप्रकल्प उभारता यावे, यासाठी मंडळाद्वारे जमिनींचे शोधकार्य सुरू असताना 23 ठिकाणे निश्‍चित  करण्यात आली आहेत. यांपैकी 14 जागांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे कोकण मंडळ मुख्य अधिका-यांनी सांगितले.
जमिनींचा तुटवडा जाणवत असल्याने परवडणा-या दरात गृहप्रकल्प उभारणे ‘म्हाडा’पुढे आव्हान आहे. मुंबई मंडळाला जाणवणारी जागेची टंचाई कोकण  मंडळालाही जाणवली. नागरिकांचे गृहस्वप्न, जमिनीचा तुटवडा लक्षात घेता विरार-बोळींज, वेंगुर्ला, मिरा रोड भागात गृहप्रकल्प पूर्णत्वास आल्यास पुढे काय?  असा प्रश्‍न कोकण मंडळाला पडला होता. त्यामुळे येत्या काळात एमएमआर परिसरात गृहप्रकल्प विस्तारावा या उद्देशाने ‘लँड बँक’ तयार करण्यास मंडळाने  सुरुवात केली. त्यासाठी एमएमआरमध्ये जमिनींचा शोध घेण्यात आला.