Breaking News

नेपाळसह श्रीलंकेच्या सहकारी बँकांच्या अधिकार्‍यांची जिल्हा बँकेस भेट

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) - ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलल्या महत्वपूर्ण कार्याच्या अभ्यासाकरिता नेपाळ व श्रीलंका तसेच भारत देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील अधिकार्‍यांनी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणे यांचेमार्फत भेट दिली. कृषी विकासासाठी कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, कृषी सहकार आणि ग्रामीण भांगात केलेल्या अर्थसहाय्याचा अभ्यास तसेच बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी अधिकारी आले. 
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भाग-भांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहाय्यता बचत गट, प्रशिक्षण केंद्र, शेतकरी ग्रुप मेडिक्ेलम पॉलीसी, किसान क्रेडिट कार्ड, विविध कर्ज योजना, बँकेला उत्कृष्ठ कामकाजाबद्दल नाबार्डचे मिळालेले बेस्ट परफॉर्मन्स् अवॉर्डस्, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये टॉपर को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून झालेली नोंद, महाराष्ट्र बँक्स् असोसिएशनचे उत्कृृष्ठ कामकाज अवॉर्डस् आदीची माहिती दिली. बँकेचे सरव्यवस्थापक एस. एन. जाधव व एम. व्ही़  जाधव यांनी पाहुण्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करून बँकेच्या कर्ज वसुलीमागील नियोजन तसेच कर्जाच्या विविध योजना ठळकपणे मांडल्या़  चर्चेदरम्यान नेपाळच्या सहकार खात्याचे असिस्टंट कमिशनर मुदिया चामिंडा म्हणाले, आम्हाला भारतातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा बँकेला भेट देवून खूपच आनंद होत आहे. या ठिकाणी सहकाराचा सशक्त विकास झाला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्कृष्ठ वातावरण दिसत आहे. सहकारात कामकाज करणार्‍या इतर बँकांनी या बँकेचा आदर्श घ्यावा, असे कामकाज आहे. बँकेचे संचालक मंडळ चांगल्या योजना राबवित असून त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे .
बँकेचे व्यवस्थापन उत्कृष्ठ असल्याची प्रतिक्रिया नेपाळ राष्ट्रीय बँकेचे डेप्युटी डायरेक्टर रामहरी दहल यांनी व्यक्त केली. वैकुंंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणे यांचेवतीने असोसिएट प्रोफेसर डॉ़  सिंग यांनी आभार व्यक्त करून बँकेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या़  नेपाळ व श्रीलंका या देशातील विविध बँकांचे पदाधिकारी अधिकारी यांनी बँकांच्या कर्ज योजना, व्याजदर, पॉलिसी, शासनाच्या योजना, एनपीए, कर्ज वसुली, कर्जवाटप, ठेवी व व्याजदर आदीच्या अनुषंगाने चर्चा केली.