Breaking News

आयटीतील लाखो नोकर्‍यांवर येणार गदा?

मुंबई, दि. 05 -   स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे (ऑटोमेशन) मुळे येणार्‍या काही वर्षात आयटी खेत्रातील नोकर्‍यांवर गदा येईल, तसेच प्रामुख्याने कमी कुशल कार्यांकरिता स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर ही परिस्थिती ओढवेल, असा अदांज अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे. अमेरिकेतील एचएफस रिसर्च संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, येत्या 2021 पर्यंत जगभरातील आयटी क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या संख्येत सुमारे 9 टक्क्यांची (14 लाख नोकर्‍या) घट होईल. फिलिपाईन्स, ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांनादेखील याचा फटका बसणार आहे.
विशेषतः बीपीओ क्षेत्रावर स्वयंचलित तंत्रज्ञानाचा सर्वाधिक नकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या या क्षेत्रात 37 लाख रोजगार उपलब्ध आहेत. कमी कुशल नोकर्‍यांच्या संख्येत 30 टक्के, मध्यम कुशल नोकर्‍यांच्या संख्येत 8 टक्के आणि सर्वाधिक कुशल नोकर्‍यांच्या संख्येत 56 टक्के घट होईल, असे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. परंतु भारतीय आयटी क्षेत्रातील संस्था नॅसकॉमने या निष्कर्षावर आक्षेप घेतला आहे. स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रावर निश्‍चितपणे परिणाम होईल. देशात नवनव्या तंत्रज्ञानामुळे तेवढ्याच प्रमाणात नवीन रोजगारनिर्मिती होईल, असे नॅसकॉमचे मत आहे. भारतीय आयटी क्षेत्रातील वरिष्ठांनीदेखील स्वयंचलित तंत्रज्ञानांमुळे नोकर्‍यांवर होणारा परिणाम मान्य केला आहे. परंतु 6.4 लाख हा खुप मोठा आकडा असल्याचे मत एका वरिष्ठ आयटी अधिकार्‍याने व्यक्त केले आहे.