Breaking News

आर्थिक देवाण-घेवाणीतून तरुणाचे अपहरण; तिघांना अटक

पुणे, दि. 08 - आर्थिक कारणावरून एका तरुणाला मोटारीमध्ये बसवून अपहरण करून मारहाण केली. तसेच, काळेवाडीमध्ये एका खोलीमध्ये नेऊन डांबून ठेवले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना आज (गुरुवारी) दुपारी साडेतीन वाजता अटक केली. हा प्रकार तापकीर मळा काळेवाडी येथे घडला. 
 महेश उर्फ सिद्धार्थ नागनाथ माडेकर (वय 33, रा. सेक्टर क्र. 16, नम्रता पार्क रो-हाऊस, चिखली-प्राधिकरण), विनोद बाळकृष्ण पासुटेकर (वय 33, रा. तापकीर मळा, नानाश्री हॉटेल जवळ, रहाटणी) आणि संतोष चंद्रकांत धरणे (वय 26, रा. तुळजा भवानी कॉम्प्लेक्स, आकुर्डी) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी सैकत तपन चटर्जी (वय-33, रा. पार्क टायटेनियम पार्क स्ट्रिट, काळेवाडी फाटा, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माडेकर याने चटर्जी यांचा भाऊ सम्राट याला काळेवाडी येथील तापकीर मळ्याजवळ बोलावून घेतले.  माडेकर या त्याच्या अन्य साथीदारा समवेत तेथे थांबला होता. माडेकर याने सम्राटला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ’तू दानेश कारभारीचे पैसे दिले नाहीत’ त्यामुळे त्याने माझे पैसे अडवून ठेवले आहे, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युतर दिल्याने चिडून जाऊन तिघांनी सम्राट यांना उचलून जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवले. त्यानंतर काळेवाडी येथे एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवले. या घटनेनंतर सम्राट यांच्या भाऊ सैकत यांनी या घटनेची माहिती वाकड पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून त्या तिघांना अटक केली. तसेच, सम्राट यांची सुटका केली. त्या तिघांकडून चौदा लाख रुपयांची टाटा सुमो मोटार (एमएच 14 एफजी 3600) जप्त केली आहे.
 सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तपास करीत आहेत.