Breaking News

बीड जिल्हा बँक प्रकरणी धनंजय मुंडेंना दिलासा

बीड, दि. 17 - बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात माजी संचालक पांडुरंग गाडे यांना न्यायालयाने जामीन दिला असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात आरोपी संचालकांना अटक करण्यापूर्वी 72 तास अगोदर त्यांना नोटीस द्यावी,  असेही म्हटले असल्याचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले.
न्यायालयाच्या या आदेशामुळे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष तपास  पथकाने बड्या राजकीय नेत्यांसहीत तब्बल 105 आरोपींविरुद्ध जिल्हा बँक प्रकरणात गुन्हे दाखल केले होते. 142 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल  झाल्याने धनंजय मुंडे , अमरसिंह पंडित, रजनी पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. दरम्यान याच प्रकरणातील एक आरोपी माजी संचालक पांडुरंग  गाडे यांना बीडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पानसरे यांनी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात कोणत्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी 72  तास अगोदर नोटीस द्या असेही म्हटले आहे.