Breaking News

हिलरी क्लिटंन यांना ओबामांचे पाठबळ

वॉशिंग्टन, दि. 11 -  अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी निश्‍चित झालेल्या हिलरी क्लिटंन यांचे अभिनंदन केले असून आपलाही पाठिंबा हिलरी क्लिटंन यांनाच असल्याचे बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. हिलरी क्लिटंन यांना पाठिंबा देत असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत अमेरिकेतील लाखो लोकांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळावी, यासाठी आपले म्हणणे मांडले आहे. त्यामध्ये माझेही मत आता मी मांडू इच्छितो, असे सांगत ओबामा म्हणाले, हिलरी क्लिटंन यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी किती अवघड आहे. हे मला माहिती असल्यामुळे ही जबाबदारी हिलरी क्लिटंन यशस्वी पद्धतीने पेलू शकतील, असे मला वाटते. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी इतका अनुभव आणि गुणवत्ता असलेली दुसरी व्यक्ती सध्यातरी मला दिसत नाही. हिलरी क्लिटंन अत्यंत धैर्यशील, मनापासून काम करणार्‍या आणि प्रेमळ आहेत. परराष्ट्र खात्याची जबाबदारी संभाळताना त्यांची निर्णय घेण्याची अचूक क्षमता मी जवळून बघितली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.