स्टार्ट अप इंडियाला थंडा प्रतिसाद
नवी दिल्ली, दि. 29 - मोदी सरकारने गाजावाजा करून जाहीर केलेल्या स्टार्ट अप इंडिया मोहीमेला थंडा प्रतिसाद मिळत आहे. ज्या जोशपूर्णरित्या मोदी यांनी स्टार्ट अप इंडियाची घोषणा केली होती, त्याचा परिणाम होताना दिसत नाही.
वाणिज्य मंत्रालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, स्टार्ट अप इंडियासाठी आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीत अवघे चार प्रस्ताव आले. दुस-या बैठकीत त्यातील फक्त तीन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले.स्टार्ट अप योजनेंतर्गत स्टार्ट अप्सना 1 एप्रिल 2016 पासून अनेक फायदे मिळणार आहेत. करसुट्टीसह आयपीआर धोरण, इन्स्पेक्टरपासून सुटका असे अनेक फायदे दिले जाणार आहेत. डीओपीपीने दिलेल्या माहितीनुसार एक आंतरमंत्रालयीन गट स्थापन केला जात आहे.
या गटाकडे कंपन्यांच्या अर्जाची छाननी करण्याचे काम आहे. या गटाची बैठक एप्रिलमध्ये झाली. त्यात फक्त एका कंपनीला आयपीआर लाभासाठी मंजुरी देण्यात आली. तर तीन कंपन्यांची अंतिम निवड करण्यात येऊन त्यांचे प्रस्ताव दुस-या बैठकीत ठेवण्यात आले.
मेमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत 30 कंपन्यांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी दहा कंपन्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते. तर 19 प्रस्ताव टाळण्यात आले. अनेक लाभ देऊनही व्यावसायिक या योजनेचा फायदा उठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. मोदी यांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.