Breaking News

कृषी अधीक्षक कार्यालयासमोर कामगारांचे धरणे

अहमदनगर । प्रतिनिधी । 09 -  जिल्ह्यातील तालुका बिजगुणन केंद्र व फलोत्पादन विभागातील राहुरी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, पुणतांबा येथील तत्कालीन रोजंदारी कामगार न्यायलयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन, कामगारांची फरकाची रक्कम व्याजासह मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोरधरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे सरचिटणीस कॉ.बाळासाहेब सुरुडे यांनी केले.
यावेळी कामगारांनी जोरदार निदर्शने केली. कॉ.सुरुडे, कॉ.राजेंद्र बावके व कॉ.मदिना शेख यांची भाषणे झाली. आंदोलनात रंजना शिंदे, सरस्वती तनपुरे, रोहिणी आस्कर, सुशीला बोडखे, संपत लबडे, शिवाजी ढवाण, गोकुळ भगत आदिंसह महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्यातील तालुका बिजगुणन केंद्र व फलोत्पादन विभागातील राहुरी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, पुणतांबा येथील कामगारांनी  1999 मध्ये समान कामाला समान वेतन, रोजंदारी दर मिळण्यासाठी कामगार न्यायलयासमोर प्रकरण दाखल केले होते. कामगार न्यायलयाने  2005 मध्ये प्रत्येक कामगज्ञरांच्या फरकाची रक्कम निश्‍चित करुन, 9 टक्के व्याज दराने रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाविरुध्द कृषी खाते महाराष्ट्र शासन यांनी औरंगाबाद खंडपीठात 82 रिटपिटीशन दाखल केले होते. दाखल करण्यात आलेले सर्व रिटपिटीशन खंडपीठाने 29 फेब्रुवारी 2014 रोजी फेटाळून कामगार न्यायलयाचे आदेश कायम केले आहेत.
सदर मागण्यांचे निवेदन कृषी अधिकारी आर.के.गायकवाड यांना देण्यात आले. कृषी अधिकारी गायकवाड यांनी शासन      स्तरावर प्रस्ताव सादर केले असून, प्रस्तावास शासनस्तरावरुन मंजुरी घेण्यासाठी पाठपुरावा चालू आहे. लवकरच प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.