Breaking News

हैदराबादमध्ये स्फोटाचा कट उधळला!

इसिस‘शी संबंधित 13 संशयितांना अटक
मोठया प्रमाणात स्फोटके जप्त
एनआयए‘ची कारवाई 

हैदराबाद, दि. 29 -  राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रात्री हैदराबादमध्ये छापे घालून बाँबस्फोटाचा कट उधळून लावत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया‘ (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित 13 संशयितांना ताब्यात घेतले. ही माहिती एनआयए‘चे पोलिस महासंचालक संजीव कुमार यांनी बुधवारी दिली. 
हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असलेल्या आणि आयसिसचे समर्थन करणार्‍या दहा संशयितांना हैदराबादमध्ये एनआयएच्या अधिकार्‍यांनी अटक केली.घटनास्थळांवरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये विविध ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट या संशयितांकडून रचला जात होता. गुप्तचर यंत्रणांकडून त्याबद्दल माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. हैदराबादमध्ये सध्या वकिलांच्या आंदोलनामुळे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर स्फोट घडवण्याची तयारी या संशयितांकडून करण्यात येत होती.
जुन्या हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा, चारमिनार, मोगलपुरा, ताबालकट्टा, भवानीनगर, अमाननगर, बहादूरपुरासह 13 ठिकाणी एनआयए‘ने मंगळवार (ता.28) रात्रीपासून बुधवारी पहाटे पाचपर्यंत छापे घातले. यात ताब्यात घेतलेल्या 13 जणांचा इसिस‘चे सीरियातील मुख्यालयाशी थेट संपर्क असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून स्फोटासाठी लागणारी रसायने, चीनी बनावटीची नऊ एम. एम. पिस्तुले, एअर गन व 15 लाख रुपयांची रोख रक्कम, पेन ड्राईव्ह, 25 मोबाईल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड इसिस‘शी संबंधित डीव्हीडी व व्हीडीओ क्लिप जप्त केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे सर्व संशयित एकमेकांशी संपर्कात होते.
जुन्या हैदराबादमधील बंडागुडा येथील निर्मनुष्य भागात हे दहशतवादी काही दिवसांपासून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत होते. रमजान तसेच गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर बाँबस्फोट करण्याचा कट त्यांनी रचला होता, असे चौकशीतून समोर आले आहे. यात अटक केलेल्या 13 पैकी सहा जणांची नावे जाहीर करण्यात आली असून, महमद इब्राहिम यजदानी, महंमद इलियास यजदानी, अब्दुल्लाह बिन अहमद अल अबुदी, अबिन महंमद, मुझफ्फर हुसेन आणि महंमद इरफान अशी त्यांची नावे आहे. मोगलपुरातील दारू गल्लीजवळील घरात राहणार्‍या पाच संशयितांनाही एनआयए‘ने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. अटक केलेल्या संशयितांकडे सापडलेले रासायनिक साहित्य कर्नाटकातील मंगळूर येथून आणले होते. याच्या तपासासाठी कर्नाटकातून आलेले पोलिसांच्या विशेष पथकानेही कारवाईत भाग घेतला.