Breaking News

चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या सुरू राहणार

। आमदार कर्डिले यांनी शेतकर्‍यांशी साधला संवाद 

पाथर्डी । प्रतिनिधी । 10 - नगर जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या मुळात उशिरा सुरु झाल्या आहेत. तरी सर्वत्र चारा उपलब्ध होईपर्यंत या सर्व छावण्या सुरुच ठेवणार आहेत असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. 
पाथर्डी तालुक्यात सहा ठिकाणी छावण्या सुरु करण्यात आल्या असून, आमदार कर्डिले यांनी नुकतीच मोहोज खुर्द, आठरे कौडगाव, मांडवे येथील जनावरांच्या छावण्यांना भेट दिली. यावेळी चारा - पाणी मिळते का? दूध वाढले का कमी झाले, जनावरांसाठी निवारा केला का असे विविध प्रश्‍न विचारत शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. ते म्हणाले मी सुद्धा एक शेतकरीच आहे. वीस ते पंचवीस म्हशींची धार काढलेली आहे. दूधवाला म्हणून माझी नगर शहराला सुरुवातीला ओळख होती नंतर आमदार आणि मंत्रीही झालो. त्यावेळी जिल्ह्यात सर्वाधिक छावण्या काढून शेतकर्‍यांचे पशुधन वाचवले, म्हणून मला सलग पाचवेळा आमदार होण्याचे पुण्य लाभले. मराठवाड्यात काही ठिकाणी छावण्या बंद झाल्या असल्या तरी नगर जिल्ह्यात चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या बंद होणार नाहीत. तसेच शेतीसाठी बैल घरी नेताना त्यांची आवक-जावक ठेवा. अडचणीवर मात करण्याचे आवाहन आमदार कर्डिले यांनी छावणीत असलेल्या शेतकर्यांना केले. यावेळी मिरी - तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, युवानेते वैभव खलाटे, सरपंच रामकिसन वांढेकर, महादेव गीते, रमेश गीते, एकनाथ वांढेकर, दिलीप वांढेकर, सुधाकर वांढेकर, शिवाजी मचे, प्रभाकर आठरे, अँड़ गणेश शिंदे, संपत आठरे आदी उपस्थित होते.