Breaking News

हरियानात शिक्षकांच्या जीन्सवर बंदी

चंदीगढ, दि. 11 -  प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या (शिक्षक व शिक्षिका) नोकरीवर असताना जीन्स घालण्यावर हरियानाच्या शिक्षण खात्याने बंदी घातली असून या बंदीमागचे कारण या आदेशामध्ये स्पष्ट केले नसून योग्य पेहराव स्वीकारून शिक्षकांनी नोकरीवर औपचारिक पोशाख वापरावा, असे म्हटले आहे.
येथील शिक्षण अधिकार्‍यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना जर शिक्षक योग्य गणवेश घालून शिस्त राखण्याचे सांगत असतील, तर तो नियम शिक्षकांना देखील लागू होतो असे म्हटले आहे. शालेय शिक्षण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव पी के दास म्हणाले की, जीन्सवर बंदी घालण्याव्यतिरिक्त शिक्षकांचा एकूण पेहराव औपचारिक राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. कामावर असताना भडक रंगाचे शर्ट घालायला परवानगी नसणार आहे व शर्टाच्या सर्व गुंड्या बंद करण्याची सक्तीही करण्यात येणार आहे. राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे महासचिव दीपक गोस्वामी यांनी हा निर्णय शिक्षक संघटनेशी चर्चा करून घ्यायला हवा होता, असे म्हटले आहे. मात्र, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सरकारने असा कुठलाही आदेश काढला नसल्याचे स्पष्ट केले आहे.