Breaking News

सनातन संस्था ही एक दहशतवादी संघटना - खेतान

नवी दिल्ली, दि. 11 -  आम आदमी पक्षाचे (आप) नेते आशिष खेतान यांनी सनातन संस्था ही एक दहशतवादी संघटना असून, हि संस्था हिंदू समाजाला लागलेला काळा डाग असल्याची टीका केली आहे.
शुक्रवारी रात्री हिंदू जनजागृती समितीच्या वीरेंद्र तावडे याला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सुमारे अडीच वर्षांनी करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे. आशिष खेतान यांनी वीरेंद्र तावडेच्या अटकेनंतर ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा होणार असल्याचे ट्विट खेतान यांनी केले होते.
खेतान यांनी आज केलेल्या ट्विटमधून म्हटले आहे, की दाभोलकरांच्या हत्येमागील मास्टरमाईंड तावडेला अटक करण्यात आली आहे. आता तपास यंत्रणा या हत्येप्रकरणी फरार असलेल्या गुन्हेगारांचाही शोध लावेल. सनातनने उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष लोकांची एक यादी बनवली असून त्यांचा अडसर दूर करण्याचा कट रचला आहे. सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील कलंक आहे. तावडेच्या अटकेमुळे याप्रकरणी न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणातील सीडी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात युपीए सरकार अपयशी ठरले होते. मालेगाव स्फोटातील सनातनच्या दोषींना एनआयए क्लिनचीट दिली आहे. मला आशा आहे, की मोदी सरकार याची दखल घेऊन सनातनसारख्या संस्थांवर बंदी घालेल आणि सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेसारख्यांना कारागृहात टाकेल.