Breaking News

मंदिरात गोमांस ठेवून दंगली घडवायच्या इसिसचा कट

हैदराबाद, दि. 30 -  रमजानदरम्यान मंदिरांमध्ये गोमांस ठेवून जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होता अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी हैदराबादमध्ये विविध ठिकाणी छापा टाकून 13 संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, ‘गोमांसाचे चार तुकडे आणि बैलाच्या मटनाचे चार तुकडे घे आणि दुसर्‍या दिवशी गोमांसाचे सात तुकडे घे‘, असा दूरध्वनी संवाद संशयिताकडून मिळाला आहे, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. तसेच हे गोमांस चारमिनार परिसर, अतिसंवेदशील ठिकाणे, मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि काही मंदिरांमध्ये ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे.
जुन्या हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा, चारमिनार, मोगलपुरा, ताबालकट्टा, भवानीनगर, अमाननगर, बहादूरपुरासह 13 ठिकाणी एनआयए‘ने मंगळवार (ता.28) रात्रीपासून बुधवारी पहाटे पाचपर्यंत छापे घातले. यात ताब्यात घेतलेल्या 13 जणांचा इसिस‘चे सीरियातील मुख्यालयाशी थेट संपर्क असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून स्फोटासाठी लागणारी रसायने, चिनी बनावटीची नऊ एम. एम. पिस्तुले, एअर गन व 15 लाख रुपयांची रोख रक्कम, पेन ड्राइव्ह, 25 मोबाईल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड इसिस‘शी संबंधित डीव्हीडी व व्हीडिओ क्लिप जप्त केली.