अंधेरीतील अग्नीतांडवात 9 जणांचा मृत्यू !
मेडिकल स्टोअरमध्ये लागली होती आग
मुंबई, दि. 30 - मुंबईत अंधेरी पश्चिमेला एका मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. यात एक तीन महिन्यांचा मुलगी आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. या महिलेला आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीच्या तळमजल्यावर हे मेडिकल स्टोअर आहे. स्टोअरच्या वरच्या मजल्यावर स्टोअर मालकाचे कुटुंब राहत होते. स्टोअरला आग लागल्यानंतर आगीची झळ वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात उंचच उंच धुराचे लोट पसरले होते. घरातून बाहेर पडण्याचा रस्ता स्टोअरमधून जाणारा असल्याने स्टोअर मालक खान कुटुंबियांना सुटकेचा मार्गच मिळाला नाही आणि आगीत कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.मृत्यूमुखींमध्ये एकाच कुटुबांतील सबुरिया खान(52), सिद्दिक खान(35), राबिल खान (28), मोझेल खान(8), उन्नीहय खान(5), अलिझा खान(4), तुबा खान(8) अल्तजा (3)या 9 जणांचा समावेश आहे. मेडिकल स्टोअरला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पण तोपर्यंत या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी होती. मात्र उपचारादरम्यान जखमी महिलेचाही मृत्यू झाला.दरम्यान लाग लागल्यानंतर एका तासात एकाच कुटुबांतील 9 जणांचा कसा मृृत्यू होतो, याबद्दल विविध तर्क वितर्क लढवण्यात येत आहे.शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.