Breaking News

गोव्यात मान्सून सक्रिय!

पणजी, दि. 24 - गेल्या दोन दिवसांत गोव्याच्या सर्वच भागांत नैऋत्य मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात पावसाचे आगमन 7 जूननंतर होऊनही गेल्या 15  दिवसांच्या काळात गोव्यात 22 इंच पाऊस झाल्याची नोंद आहे. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला दमदार पाऊस मंगळवार आणि बुधवारीही सुरूच होता.  गोव्यातील बळीराजाची कामे आता सुरू झाल्याचेही दिसत आहे. मागील दोन दिवसांत गोव्याच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस झाला असला तरी किरकोळ  अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

मंगळवारी सकाळपासून पेडण्यापासून काणकोणपर्यंतच्या सर्वच भागांत तुफान पर्जन्यवृष्टी झाली. पणजी या राजधानी शहरात रस्ते पाण्याने तुडुंब भरून गेले होते.  अलीकडच्या काळात गोव्यात पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने उत्तर भारतीय पर्यटक येत असल्याने त्यांना या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचा आनंद घेणे  शक्य झाले आहे. पणजी, काणकोण, सत्तरी या भागात केवळ एकाच दिवसात नऊ इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती पणजी वेधशाळेने दिली.
पणजीतील आल्तिनो परिसरात रस्त्याशेजारी असलेले एक गुलमोहोराचे झाड अचानक कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत स्कूटरस्वार अमेय यशवंत पाटील (22)  जखमी झाला. त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
गोव्यात दरवर्षी सरासरी सव्वाशे इंच पाऊस होतो, असा आजवरचा अनुभव आहे. या वर्षीच्या पहिल्या पंधरवडयातच पावसाने इंचाच्या पाव शतकाकडे वाटचाल  सुरू केल्याने या वर्षी पाऊस समाधानकारक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृग नक्षत्रातील पाऊस समाधानकारक झाल्याने बळीराजा सुखावला  असून; शेतीच्या कामांनाही गोव्याच्या सर्वच भागांत सुरुवात झाली आहे.