युवराज संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती
भाजपच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब
कोल्हापूर, दि. 12 - युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. भाजपने त्यांच्या नावाची शिफारस राज्यसभेसाठी केली होती. ते खासदार झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भवानी मंडप, शिवाजी पुतळा परिसरात त्यांच्या कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. काही दिवसांपासून त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आजअखेर शिक्कामोर्तब झाले.लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अपक्ष उमेदवार (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी राजकीय पक्षांपासून अलिप्त राहत तरुणांच्या संघटनाचे काम सुरू केले. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागांत त्यांनी तरुणांचे मोठ्या प्रमाणात संघटन करण्याचे काम सुरू केले. रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळाही भव्यदिव्य करत लाखो तरुणांना दिशा देण्याचे काम सुरू केले. या सर्व कामाची दखल घेत भाजपने संभाजीराजे यांना खासदार करण्यासाठी प्रयत्न सुरूच केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाली. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या संभाजीराजे यांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यापेक्षा राजर्षी शाहूंच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी थेट राष्ट्रपतींकडून नेमणूक करण्याचे ठरले. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.
संभाजीराजे यांची वाटचाल
संभाजीराजे हे कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. न्यू कॉलेजमधून 1992 ला बी. ए. झालेल्या संभाजीराजे यांनी 1994 ला सायबरमधून एमबीए केले. फेब्रुवारी 2009 मध्ये अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या किल्ले रायगडावरील मेघडंबरीत संभाजीराजे यांच्या प्रयत्नामुळेच शिवाजीमहाराजांचा पुतळा बसवण्यात आला. लखनौ (उत्तर प्रदेश) येथे 2009 मध्ये झालेल्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेस युवराज संभाजीराजे छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथमच राजर्षी शाहू महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे यांना महासभेचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 2009 मध्ये रिंगणात होते. नंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीत महत्त्वाची कामगिरी केली.
