राज्यसभा निवडणूक;भाजपला 2 जागांचा फायदा
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनेही महत्त्वाच्या जागा जिंकल्या
नवी दिल्ली, दि. 12 - राज्यसभेच्या 27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला काही धक्के बसले. विशेषतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड येथे पक्षाने अपक्षांना पुरस्कृत करून अतिरिक्त जागा जिंकण्याचे जे प्रयत्न केले ते असफल ठरले. झारखंड व हरियानामध्ये मात्र ही खेळी यशस्वी ठरली व भाजपला दोन अतिरिक्त जागा मिळाल्या, तर काँग्रेसने आपल्या महत्त्वाच्या जागांवर विजय मिळविला.राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 31 सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते आणि उर्वरित 27 जागांसाठी आज मतदान आणि मतमोजणी झाली.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 11 जागा होत्या. यामध्ये समाजवादी पक्षाला 7, बहुजन समाज पक्षाला 2, तर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. समाजवादी व बहुजन समाजच्या मदतीने काँग्रेसची एक जागा निवडली जाणे अपेक्षित होते. परंतु भाजपने एक अपक्ष उमेदवार प्रीती महापात्र या महिला उमेदवाराला पुरस्कृत करून पाठिंबा दिला. यामुळे काँग्रेसचे कपिल सिब्बल यांना धोका निर्माण झाला होता. परंतु उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक आणि मुस्लिम समाजाची निर्णायक मते या बाबी लक्षात घेऊन सत्तारूढ समाजवादी पक्षाला आणि पुढील वर्षी सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणार्या बहुजन समाज पक्षाला ते भाजपबरोबर आहेत हे दिसणे धोक्याचे ठरले असते आणि त्यामुळेच अटीतटीने झालेल्या या निवडणुकीत अखेर कपिल सिब्बल (काँग्रेस) विजयी ठरले.
उत्तराखंडमध्ये एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि तेथे काँग्रेसकडे बहुमत होते परंतु काँग्रेसमधील सुंदोपसुंदी, अलीकडच्या काळात तेथे झालेले फाटाफुटीचे राजकारण या पार्श्वभूमीवर भाजपने दोन अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करून उभे केले होते. परंतु भाजपचा तो डावही फसला आणि काँग्रेसचे प्रदीप टाम्टा विजयी झाले. असाच प्रकार मध्य प्रदेशातही झाला. काँग्रेसने तेथील एक वकील विवेक तनखा यांना उभे केले होते. काँग्रेसला तेथे काही मते कमी पडत होती, परंतु बहुजन समाज पक्षाने उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला निर्णायक साथ दिली आणि उत्तराखंड प्रमाणेच मध्य प्रदेशातही काँग्रेसचे उमेदवार विवेक तनखा विजयी झाले.
कर्नाटकमध्येही भाजपला धक्का बसला. तेथील चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. मात्र काँग्रेसने आपल्या तिन्ही जागा जिंकल्या, तर भाजपच्या निर्मला सीतारामन यांनी विजय मिळविला.
हरियाना आणि झारखंडमध्ये मात्र भाजपची खेळी यशस्वी ठरली. हरयानामध्ये दोन जागांसाठी निवडणूक होती. काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नव्हता आणि ओमप्रकाश चौटाला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार व वकील आर. के. आनंद यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु भाजपने झी‘ वाहिनीचे मालक सुभाष चंद्रा यांना पुरस्कृत करून पाठिंबा दिला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांनी लोकदलाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे नाकारले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हुडा यांना दिल्लीत बोलावून घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी ठरला नाही. हुडा यांच्याविरुद्ध भाजप सरकारने जमीन खरेदी व्यवहारांच्या प्रकरणांमध्ये चौकशी व तपासाचा ससेमिरा लावलेला असल्याने हुडा यांनी हा खेळ‘ केला असावा, असेही मानले जाते. झारखंडमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांविरुद्ध अचानक कारवाईचा बडगा उगारणे वगैरे खेळी करून भाजपने एक अतिरिक्त जागा पदरात पाडण्यात यश मिळविले.
राजस्थानात भाजपचा विजय स्पष्ट होता. काँग्रेसने तेथे उद्योगपती कमल मुरारका यांना पाठिंबा दिलेला होता. बहुजन समाज पक्ष, काही अपक्षांच्या मदतीने आणि मुरारका यांचे भाजपमधील काही बंडखोरांशी असलेले संबंध लक्षात घेऊन ही जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. परंतु तो असफल ठरला. नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू आणि भाजपचे सरचिटणीस व एक वरिष्ठ नेते ओमप्रकाश माथूर हे राजस्थानातून विजयी झाले.
निवडणुकीचे चित्र (7 राज्यांतील 27 जागांसाठी मतदान)
- उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला 7, बहुजन समाज पक्षाला 2, तर भाजप व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा
- कर्नाटकातील चारपैकी तीन जागांवर काँग्रेस विजयी; भाजपला केवळ एक जागा
- मध्य प्रदेशात भाजपने दोन, तर काँग्रेसने एक जागा जिंकली
- हरियानातील दोन जागांवर भाजपचा एक आणि भाजपने पाठिंबा दिलेला एक उमेदवार विजयी
- झारखंडमध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी
- राजस्थानमधील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी
- उत्तराखंडमधील एकमेव जागा काँग्रेसला मिळाली
(8 राज्यांतून 31 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत)
पक्षनिहाय जिंकलेल्या जागा
भाजप : 12
समाजवादी पक्ष : 07
काँग्रेस : 06
बहुजन समाज पक्ष : 02
प्रमुख विजयी उमेदवार
भाजप : वेंकय्या नायडू, मुख्तार अब्बास नक्वी, एम. जे. अकबर, अनिल माधव दवे, महेश पोद्दार, ओ. पी. माथुर, रामकुमार वर्मा, हर्षवर्धनसिंह, निर्मला सीतारामन, बीरेंद्र सिंह, सुभाष चंद्रा (पुरस्कृत).
काँग्रेस : कपिल सिब्बल, जयराम रमेश, ऑस्कर फर्नांडिस, के. सी. रामामूर्ती, प्रदीप टम्टा (काँग्रेस), विजय तनखा (पुरस्कृत).
समाजवादी पक्ष : बेनी प्रसाद वर्मा, अमर सिंह, संजय सेठ, रेवती रणम सिंह, विश्वंभर प्रसाद निषाद, सुखराम सिंह यादव, सुरेंद्र नागर.
बसप : सतीश चंद्र मिश्र, अशोक सिद्धार्थ
