Breaking News

श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी सुनिता शिंदे

। 1 महिना व 22 दिवसांचा कालावधी  । पाचपुते गटाची सरशी । नागवडे, पाचपुते गट एकत्र 

 श्रीगोंदा (प्रतिनिधी) । 11 - श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत  चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सुनिता मच्छिंद्र शिंदे
या आठ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मीना संतोष शेंडगे यांना सहा मते मिळाली. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी दु. 2 वाजता नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांनी सौ. सुनिता मच्छिंद्र शिंदे यांची श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदी निवड झाल्याचे जाहीर केले. 
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच नागवडे-पाचपुते गट एकत्र असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे 8 विरुध्द 6 असे मतदान घेत पाचपुते गटाची सरशी झाल्याने नगराध्यक्षापद राखण्यास पाचपुते गटाला यश आले. 18 नगरसेवकांपैकी  वैशाली आळेकर, गयाबाई सुपेकर, कुसुम दांडेकर ( सर्व काँग्रेस ) व अर्चना गोरे (भाजप) या चार नगरसेविका  गैरहजर राहिल्या.सुनिता शिंदे यांच्या नगराध्यक्ष पदाची मुदत 31 जुलै 2016 रोजी संपत असल्याने त्यांना केवळ 1 महिना व 22 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 1 ऑगस्ट 2016 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातून पुढील अडीच वर्षासाठी नवीन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यावेळी पाचपुते गटाचे गटनेते मनोहर पोटे हे गटनेते होते. तर आमदार राहुल जगताप गटाचे गटनेते अख्तर शेख यांनी निवडणूक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नूतन नगराध्यक्षा सुनिता मच्छिंद्र शिंदे यांची श्रीगोंदा शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल 13 जानेवारी 2014 रोजी लागून बबनराव पाचपुते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा व काँग्रेसचे आठ व काँग्रेस पुरस्कृत गयाबाई सुपेकर निवडून आल्या होत्या.राष्ट्रवादीने दहा नगरसेवकांच्या तर काँग्रेसने नऊ नगरसेवकांच्या गटबंधनाची  नोंदणी जिल्हाधिका-यांकडे केली होती.आक्टोबर 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लागल्यावर बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला व ते विधान सभेची निवडणूक हरले. नोव्हेंबर 2014 मध्ये बबनराव पाचपुते  यांनी दहा पैकी नऊ नगरसेवकांची  शहर विकास आघाडी म्हणून गटबंधन केले. त्यामध्ये अख्तर शेख सामील झाले नाही.ते राष्ट्रवादीतच राहिले. अर्चना गोरे यांना 10 महिने नगराध्यक्ष करण्याचा दिलेला शब्द पाचपुते गटाने न पाळल्यामुळे अर्चना गोरे नाराज होऊन काँग्रेसच्या गटात दाखल झाल्या व शहर विकास  आघाडीच्या गट बंधनातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी जिल्हाधिका-यांकडे अर्ज दाखल केला. परंतु जिल्हाधिका-यांनी त्या अर्जाला मान्यता न दिल्याने अर्चना गोरे शहर विकास आघाडीच्या बंधनात अडकून पडल्या.25 मे रोजी छाया गोरे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण होऊन सुनिता शिंदे, अर्चना गोरे व मीना शेंडगे यांनी अर्ज दाखल केले. गोरे यांनी माघार घेतल्याने पाचपुते गटाच्या सुनिता शिंदे व आ. राहुल जगताप गटाच्या मीना शेंडगे निवडणूक रिंगणात उतरल्या.
दरम्यान काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांपैकी नंदकुमार बोरुडे अपात्र ठरले व काँग्रेसला अख्तर शेख आणि अर्चना गोरे यांनी साथ दिली. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ दहा झाले. तर भाजपाचे संख्याबळ आठ राहिले.काँग्रेसमध्ये एकोपा राहिला असता तर मीना शेंडगे नगराध्यक्ष झाल्या असत्या. भाजपच्या गटबंधनातील  नऊ नगरसेवकांना गटनेते मनोहर पोटे यांनी व्हीप बजावला. तर काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना उपगटनेते भरत नाहाटा यांनी व्हीप बजावला. अख्तर शेख राष्ट्रवादी मध्ये असून सध्या ते कोणत्याच गट बंधनात नाहीत.
दोन्ही बाजूच्या व्हीप बजावणी नंतर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 च्या पक्षांतर बंदी कायद्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काँग्रेसला मानणा-या चार नगरसेवकांनी गैरहजर राहणे पसंत केले.व्हीप बजावनीची  कायदेशीर कारवाई केली तर यामध्ये काँग्रेसला मानणारे चार नगरसेवक अपात्र होऊन काँग्रेसचे संख्याबळ सहा आणि भाजपचे संख्याबळ आठ राहील. व ही बाब ऑगस्ट 2016 मध्ये होणा-या नागराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरेल. त्यामुळे व्हीपची कायदेशीर कारवाई करण्याच्या फंदात काँग्रेस पडणार नाही. व काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची भाजपला अप्रत्यक्ष मदत झाल्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव अर्चना गोरे यांच्यावरही कारवाई होणार नाही. नगराध्यक्ष निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारे संतोष भोर व सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी काम पहिले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.या निवडणुकीने मात्र काँग्रेसच्या एकोप्याला तडे गेलेत असून नागवडे जगताप गटामध्ये शीत युद्ध चालले असल्याचे स्पष्ट दिसते.
याबाबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे राजेंद्रदादा नागवडे यांनी सांगितले की, श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी काँग्रसच्या नगरसेवकांनी या निवडणुकीसाठी पाचपुते गटाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना परवानगी दिल्यामुळे पाचपुते गटाचा नगराध्यक्ष झाला. पाचपुते व नागवडे यांचेच श्रीगोंदा शहरासह तालुक्यावर वर्चस्व असून नागवडे यांनी मा. शरद पवारसाहेबांना शब्द दिला म्हणून राहुल जगताप आमदार झाले आहेत अन्यथा चित्र काही वेगळेच असते. श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद पुढील अडीच वर्षासाठी खुला प्रवर्गासाठी असल्याने त्यावेळेस नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आत्ताच राजकारणातील तज्ञ गणिते मांडत आहेत.