Breaking News

भिंगारच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक

। मुख्य कार्यकारी अधिकार्‍यामुळे भिंगारचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार । काँग्रेस पदाधिकार्‍याची मुख्य कार्यकारी अधिकारी लोटे यांच्याशी चर्चा 

अहमदनगर (प्रतिनिधी)। 11 - भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे यांची भिंगार मधील पाणी प्रश्‍नासंदर्भात काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अँड़ आर.आर. पिल्ले यांच्या समवेत पदाधिकार्यांनी भेट घेवून शहरातील प्रलंबित कामाबाबत चर्चा केली. यावेळी कार्याध्यक्ष शामराव वाघस्कर, सरचिटणीस रिजवान शेख, यांनी चर्चेत सहभाग घेतला. 
भिंगारमध्ये मागील पंधरा दिवसांपासून पाण्याचा अत्यंत तुटवडा असून स्वतंत्र काळापासून आजपर्यंत अशी वेळ भिंगार वासीयांवर आली नव्हती. एकच दिवस अर्धा तास पाणी आले होते व नंतर बंद झाले. त्यासंदर्भात कॅन्टोन्मेंटच्या अधिकार्यांनी सांगितले की, आज पाणी आर्मी विभागाला देणार व नंतर दोन दिवसांनी भिंगार मधील नागरिकांसाठी सोडणार, पण त्यापेक्षा आर्धे पाणी आर्मीला द्या व आर्धे पाणी गावकर्‍यांना द्या, तसा पत्र व्यवहार त्वरित आजच मिलेटरी अधिकार्यांना करा असे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकर्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत मुख्याधिकार्यांनी इंजिनिअर महेंद्र सोनवणे यांना सूचना केली. त्यामुळे भिंगार मधील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तसेच शहरातील रस्ता रुंदीकरण करणे, अनधिकृत टपर्यांचे अतिक्रमण कमी करणे, मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करणे, कापूरवाडी तलावातील गाळ काढणे, समंगा नदी (नाला) रुंदीकरण करणे, ड्रेनेज लाईन (पाईप) टाकणे, पोलिस स्टेशन स्थलांतरीत करणे, पेट्रोल पंपासाठी प्रयत्न करणे, शववाहिनी वाहन तयार करणे, भुईकोट किल्ला कॅन्टोन्मेंटच्या ताब्यात घेणे, भिंगार वेशीचे बांधकाम करणे आदी प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात चर्चा झाली. यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांची मदत घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकार्यांची एकत्रित बैठक घेवून सर्व विषय मार्गी लावण्याचे ठरले. चालू महिन्यात बैठक घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री यांच्या कार्यालयातून मिळाले आहे. या प्रसंगी सागर चाबुकस्वार, अँड़ दावर शेख, संतोष धीवर, संजय छत्तीसे, जालिंदर अळकुटे, संजय झोडगे, लक्ष्मण साखरे, सुनील उल्हारे, निजाम पठाण, संतोष कोलते, राहुल काळे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.