Breaking News

आता औद्योगिक वसाहतीचे उद्दिष्ट

। जामखेड येथे गरजूंना साहित्याचे वाटप 

जामखेड (प्रतिनिधी) । 12 -  मंत्रिपदाचा वापर करून तालुक्यात मोठा निधी आणला. यातून विकास कामे मार्गी लागली आहेत. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना तालुक्यात राबविल्या. आगामी काळात औद्योगिक वसाहत चालू करणे हेच आपले उद्दिष्ट राहणार आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सूचित केले. 
जामखेड पंचायत समितीच्यावतीने लाभार्थींर्ना पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री शिंदे म्हणाले, श्रीगोंदा - जामखेड, जवळा - जामखेड या राज्यमार्गाच्या कामासाठी निधी उपलब्ध केला असून टेंडर प्रक्रिया झाली आहे. मार्च महिन्यापर्यंत रस्ते होतील. जामखेड येथील ग्रामदैवत नागेश्‍वर मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्यातील पहिले आयएसओ मानांकन जामखेड पंचायत समितीला मिळावे यासाठी शेवटच्या टप्प्यात वाटचाल चालू असल्याचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी सांगितले. सभापती भगवान मुरुमकर, शरद कार्ले, विलास मोरे यांचीही भाषणे झाली.  यावेळी पं. स. सभापती भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पं. स. उपसभापती यमुना मोरे, सुशीला राजगुरू, दीपक पाटील, शरद कार्ले, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण सानप, ’रोहयो’चे तालुकाध्यक्ष संजय गोपाळघरे, ह. भ. प. अमृत डुचे, नगरपरिषद गटनेता महेश निमोणकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बाजार समितीचे संचालक करण ढवळे तसेच इतर मान्यवर हजर होते.
जामखेडमध्ये विकास कामे करूनही शहरवासियांनी रिझल्ट दिला नाही. तरीही राग न धरता आठ कोटी रुपयांचा निधी शहरातील रस्त्याच्या कामासाठी दिला. व भुतवडा तलावातील गाळ काढण्यासाठी 25 लाखाचा निधी दिला. काही लोकांनी भ्रष्टाचार, दोन नंबरच्या भाषा केली होती. आता तालुक्यातच नव्हे तर राज्यात धंदे बंद आहेत. कोठे चालू असेल तर माहिती द्या, असा टोला पालकमंत्री राम शिंदे यांनी माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव न घेता लगावला.