तुर्कस्तानचे इस्तंबुल विमानतळ हादरले !
दहशतवादी हल्ल्यात 36 ठार 150 हून अधिक जखमी
’आयसिस’चा हात असल्याचा संशय
इस्तंबुल, दि. 29 - तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटात 36 जण ठार झाले असून, 150 हून अधिक जण जखमी आहेत. इस्लामिक स्टेटने (इसिस) हा हल्ला घडवून आणला आहे. तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला. विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले करण्यात आले. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तुर्कस्तानचे पंतप्रधान बिनाली यिल्दीरीम यांनी इसिसकडून हा हल्ला घडविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता असून, तुर्कस्तानच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी इस्तंबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेट क्रमांक 1 मधून प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात अनेक जण जागीच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले आहेत.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तुर्कीमधील भारतीयांना तात्काळ कोणतीही मदत हवी असल्यास भारत सरकारने इर्मजन्सी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. कुठल्याही भारतीयाला मदत हवी असल्यास तो पुढील क्रमांकवर फोन करु शकतो.
+90-530-5671095/8258037/4123625 गोळीबार सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्वरित विमानतळाच्या दिशेने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला अमानवी आणि भयावह असल्याचे म्हटले आहे.