Breaking News

गृहमंत्रालयाचे महत्वाचे अधिकारी 26/11 हल्ल्यावेळी पाकचे पाहुणे

नवी दिल्ली, दि. 11 -  देशातील महत्वाच्या सुरक्षा संस्थांचे उच्च अधिकारी मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यावेळी चक्क पाकिस्तानात पाहुणचार घेत होते अशी माहिती आता पुढे असल्यामुळे या हल्ल्याच्यावेळी कारवाईसंदर्भातील निर्णय घेण्यात उशिर झाला, असे गृह खात्यातील तत्कालीन उच्च अधिकारी आर.व्ही.एस. मणी यांनी स्पष्ट केले आहे. अनेकांचा जीव 2008 साली 26 नोव्हेंबरला केलेल्या हल्ल्यात गेला. सलग 4 दिवस दहशतवाद्यांनी मुंबईकरांना आणि देशातील सर्वच सुरक्षा संस्थांना वेठीस धरले होते.

मात्र, याचवेळी भारतातील उच्च अधिकारी चर्चेसाठी पाकिस्तानात होते. या हल्ल्यादरम्यान त्यांना भारतातून संपर्क साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र त्यावेळी या अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे यासंदर्भातील आरटीआयला उत्तर देताना भारतीय अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष झाले नसल्याची बाब समोर आली आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचे मणी यांचे म्हणणे आहे. तर मणी स्वतः पाकिस्तानात जाणार्‍या शिष्ठमंडळामध्ये सहभागी नव्हते, त्यामुळे त्यातील सहभागीच यासंदर्भात अधिक खुलासा करु शकतील असे मणी यांनी स्पष्ट केले आहे.
ज्यावेळी दहशतवादी हल्ला सुरू होता. त्यावेळी नियंत्रण कक्षात बीएसएफ, आयटीबीपी, सीआरपीएफ या निमलष्करी दलांचे अधिकारी होते. त्यांनी पाकिस्तानात चर्चेसाठी गेलेल्या दहशतवाद विरोधी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याबरोबर संपर्क होऊ शकला नाही अशी माहितीही मणी यांनी दिली.
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, त्यांची या प्रकरणातील भूमिका ही मर्यादित होती. तरीही ते मुंबईला रवाना झाले होते. वास्तविक अशा प्रकरणात गृहमंत्रालयाची आदर्श कारवाई प्रक्रिया असते. त्यामध्ये अधिकार्‍यांनाच निर्णय घ्यावे लागतात. त्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरिय अधिकार्‍यांची गरज असते. मात्र या मोक्याच्यावेळी हे अधिकारीच मुंबई बाहेरच नव्हे तर चक्क पाकिस्तानातच होते.