Breaking News

आंध्र प्रदेशमधील बसमध्ये लाईव्ह टीव्हीची सुविधा

विजयवाडा, दि. 07 -  प्रचंड तोट्यात आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यरत असल्यामुळेच परिवहन महामंडळ येथील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मंडळाकडून अमरावती बसमध्ये थेट लाईव्ह टीव्हीची सुविधा सुरु केली आहे. या बस विजयवाडा-चेन्नई, विजयवाडा-हैदराबाद आणि विजयवाडा-बंगळूरू दरम्यान चालवल्या जात आहेत.
या बसच्या प्रत्येक सीटच्या मागच्या बाजूला विमानातील सीटप्रमाणे एलसीडी स्क्रीन बसवण्यात आली आहे. प्रत्येक सीटला स्वतंत्र रिमोट कंट्रोलर आणि इअर पीस पुरवण्यात आल्यामुळेच प्रवाशांना यावर त्यांच्या आवडीचा कार्यक्रम पहाता येईल. यामुळे त्यांचे नक्कीच मनोरंजन होईल असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.
सोमवारी पंडीत नेहरू बस स्थानकात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या सुविधेचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिकीट वेंडिंग मशीन, इंटेलिजंट तिकीट इशुइंग मशीन, आरटीसी मोबाईल अ‍ॅप सुरु केले. आंध्रप्रदेशचे हैदराबाद बस भवन येथील कामगार नव्याने सुरु करण्यात आलेल्या प्रशासकीय ब्लॉकमध्ये रुजू होतील असे अधिकार्‍यांनी सांगितले.