Breaking News

संघाचा डाव !

देशात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण संस्था, धार्मिक संस्था यातून आपले संघाचे विचार  पेरण्याचे काम जसे सुरू केले, त्याहून एक वेगळा प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून, सुरतमधील मंदिरात स्वामीनारायण देवाला चक्क संघाचा गणवेश  घालण्यात आला. हा प्रकार गंभीर असून, धार्मिक संस्था आपल्या ताब्यात घेण्याचा संघाचे मनसुभे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिक्षण संस्था, धार्मिक संस्था,  ताब्यात आल्यात तर सत्ता करणे सोपे जाते, हाच संघाचा छुपा अजेंडा आहे. स्वामीनारायण देवाला आरएसएसचा गणवेश घातलेला फोटो सोशल मिडियावर  व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. या फोटोमध्ये देवाला आरएसएसच्या गणवेशाप्रमाणे पांढरा शर्ट, खाटी पँट आणि काळे बूट घातलेले दिसत आहे.  इतकेच नाही तर देवाच्या हातात भारताचा झेंडादेखील देण्यात आला आहे.खरंतर हा प्रकार दुर्दैवी नसून जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. प्रत्येक गोष्ट्रीवर संघाचे  लेबल चिकटवून तो आपल्याच म्हणण्याचा अट्टाहास संघाने चालविलेला आहे. त्यामुळेच आता देशातील मंदिरे संघाच्या मालकीचे असल्याचा आव आणून त्या  मंदिरातील देवाला आज संघाचा गणवेश घातला, यानंतर संघाचे विचार पुजार्‍यांचा, भाविकांच्या गळी उतरविण्याचे काम संघ करणार आहे, हेच त्यांच्या या कृतीतून  स्पष्ट होते. ब्राम्हणी विचारातून बहूजनांना गुलाम करण्याचाच हा डाव आहे. संघाचे विचार लादून त्या व्यक्तिमत्वाला खुजे करण्याचा, आपलेसे करण्याची संघाची  नेहमीचीच खेळी. देशात भाजपा सत्तेवर असल्यामुळे कायद्याची बूज राखण्याची जवाबदारी देखील भाजपावर येते, मात्र याला हरताल फासत नेहमीच विविध  विषयावर वादंग निर्माण करण्यात संघाने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे, तर भाजपाच्या खासदार साध्वी, साधू महंत यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेची  राळ उडविली आहे. संसदेत प्रवेश करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पायावर नतमस्तक होवून आपल्या सभ्यतेचा परिचय दिला होता, मात्र ती  सभ्यता त्यांची संसदेच्या आत कधी दिसलीच नाही. संसदीय लोकशाहीमध्ये विभूतीपुजा ही मारक आहे. विभुतीपूजा वाढली की देशहिताचे निर्णय बाजूला पडतात  आणि व्यक्तीस्तोम सुरू होता. त्याचाच परिचय मोदी यांनी दिला आहे. भाजपा, देशाचे सरकार स्वभोवती केंद्रित करून एककल्ली कारभार चालवला आहे. त्यातून  स्वताचे व्यक्तीस्तोम, व्यक्तीपुजा करून घेण्यात मोदी 2 वर्षात काही अंशी यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच मोदी यांनी संघाच्या, भाजपाच्या वादग्रस्त मुद्दयावर  बोलण्याऐवजी चुप्पी साधली आहे. भारत माता की जय, आरक्षण, धर्मनिरपेक्षता, यावर उहापोह करण्याऐवजी यावर वादगं कसे माजेल याचीच पुरेपुर दक्षता  संघासह भाजपाने घेतली आहे. त्यामुळे सुरतमधील मंदिरातील स्वामीनारायणाला संघाचा गणवेश घालण्याचा प्रकार असो अन्यथा इतर प्रकार. भाजपाचे नवखे  खासदार नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असतांना भाजपा पक्षक्षेष्ठीकडून त्यांना समज, कारवाई करण्याऐवजी  नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते.