मुंबई शहर इलाखात लाचखोरीत 30% चा उच्चांक, मुख्यमंत्र्यांना साकडे
श्रीरामपूरचे सामाजिक कार्यकर्ते आझाद मैदानावर करणार उपोषण
मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 10 - सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार नेमका कोण आणि कुणाच्या इशार्यावरून चालवतो? असा गंभीर सवाल श्रीरामपूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राने उपस्थित केला आहे. या पत्रात मुंबई शहर इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या लाचखोरीची कुंडली मांडण्यात आली असून सन 2014-15 व 2015-16 या दोन आर्थिक वर्षात तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे व विद्यमान कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी स्पील मंजूर न करताच वादग्रस्त देयके अदा करून 30 टक्के लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी न झाल्यास 1 जुलै रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही या पत्रात दिला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराला राजशिष्टाचाराचा दर्जा मिळवून देणारे छगन भुजबळ यांची पावले आर्थरमध्ये असली, त्यांना सहकार्य करणार्या क्षेत्रीय अभियंत्यांची पावले आर्थरच्या दिशेने पडू पहात असली तरी साबांतील भ्रष्टाचाराच्या पाऊलखुणा मात्र आणखी उजळतांना दिसत आहेत. या पाऊलखुणा आणखी स्पष्टपपणे उमटाव्यात अशाच पध्दतीने भ्रष्ट जातकुळीतील पिलावळ कार्यरत असल्यामुळे भुजबळांच्या पाठोेपाठ देबडवार, अतुल चव्हाण, या मंडळींची भ्रष्ट परंपरा मुंबई शहर इलाखा विभागात अजूनही सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. उल्हास देबडवार यांच्यानंतर मुंबई शहर इलाखा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे व विद्यमान कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी लाचखोरीचा उच्चांक गाठून 30 टक्के लाच देणार्या कंत्राटदारांचीच देयके अदा करण्याचा सपाटा लावला. या लाचखोरीत ही मंडळी इतकी बुडाली की, आपण कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी 98 कोटी देयके रद्द करण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावातील देयकेही 30 टक्क्यांच्या मोहाला बळी पडून अदा करीत आहोत याचेही भान त्यांना राहिले नाही. नेमका हाच मुद्दा उपस्थित करून श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रंजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांचे साबां घोटाळ्याकडे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल, साबांमंत्री, लोकायुक्त, मुख्यसचिव पोलीस महासंचालक, अतिरिक्त साबां सचिव, साबां सचिव यांना पाठविलेल्या पत्रात रंजन साळवी म्हणतात की, मुंबई शहर इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मुंबई शहर इलाखा विभागात 30 टक्के लाच देणार्या ठेकेदारांची किशोर पाटील यांनी रद्द केलेल्या कामाची देयके अदा केली. सदर देयके कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी शासनाचे हीत जोपासण्यासाठी व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 98 कोटीच्या निविदा रद्द प्रस्ताव अधिक्षक अभियंता साबां.मंडळ मुंबई यांना दि. 11/7/2014 व दि. 14/7/2014 रोजी निविदा रद्द प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला होता. सदर प्रकरणी निवृत्त कार्यकारी अभियंता स्वामीदास चोबे यांनी 112 कोटीचा गैर व्यवहार केल्याचा प्रकार कर्तव्यदक्ष किशोर पाटील यांनी उघडकीस आणला होता. परंतु स्वामीदास चोबे यांनी कुठलाही गैरव्यवहार केला नसल्याची क्लिनचिट एसीबी मुंबई यांनी शासनाला दिल्याने कथित घोटाळा प्रकरणी किशोर पाटील यांनी रद्द केलेल्या प्रस्तावातील देयके सध्याच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी ज्या मजूर संस्थेच्या ठेकेदारांकडून 30 टक्के प्रमाणे लाच घेतली. त्यामध्ये अहमद 1 कोटी 50 लाख, दिनेश (दादा) इंगळे - 2 कोटी 50 लाख, मुकुंद काकड- 3 कोटी 10 लाख, अजित यलमार - 2 कोटी 20 लाख व असे अनेक ठेकेदार यांची देयके अदा करण्यात आले आहेत. सदर देयके हे रद्द प्रस्तावातील व काही प्रशासकीय मंजूरी नसलेली देयके अदा केली आहेत. श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी मार्च 2016 अखेर स्पिल मंजूर नसलेले देयके अदा केली आहेत. यांची चौकशी करण्यात यावी व अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीमता प्रज्ञा वाळके यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा व खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चौकशी न झाल्यास दि. 1 जुलैपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.
देबडवारांनी गुळणी का धरली
दीड वर्षात खुलासा का नाही झाला?
मुंबई साबां शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता स्वामीदास चौबे यांनी 112.56 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याची बोंब तत्कालीन अधिक्षक अभियंता उल्हास देबडवार यांनी मारली होती. त्यानंतर 7-8 महिने प्रतिक्षा केल्यानंतर त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. खरे तर या प्रकरणात एसीबीनेही चौबे यांना क्लिन चिट दिली आहे. नागपूर ऑडीट जनरलनेही घोटाळा न झाल्याचा निर्वाळा दिला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग मुबंई, यांनी देबडवार यांना तपासी अधिकारी नितिन उन्हवले यांनी यासंदर्भातील खुलासा मागितला होता, मात्र दिड वर्षात देबडवार यांनी कुठलाच खुलासा केला नाही, आता उल्हास देबडवार यांनी गुळणी का धरली? असा प्रश्न निर्माण होत आहे
. तसेच अधीक्षक अभियंता सी.व्ही तुंगे यांनी देखील यासंदर्भात अर्धवट खुलासा केला आहे.
भुजबळांना सहकार्य करणारा कार्यकारी अभियंता कोण? कॅटच्या अहवालातून निर्माण झाला प्रश्न
सायन-पनवेल आणि भिवंडी-चिचोंडी महामार्गाचे टेंडर वाटपाचा शेवटचा दिवस... या दोन्ही वेळी साबां मंडळाचा एकच कार्यकारी अभियंता बेपत्ता होणे हा निव्वळ योगायोग कसा? हे दोन्ही टेंडर वाटप वेगवेगळ्या दिवशी... त्या दोन्ही वेळेला तो कार्यकारी अभियंता गैरहजर असण्यामागे कोणते गौडबंगाल दडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आयआरबीने केलेल्या तक्रारीनंतर कॅटने आक्षेप नोंदविलेल्या अहवालात आहेत. सोमवारपासून या अहवालाचा आढावा. भुजबळांना मदत करणारा तो कार्यकारी अभियंता कोण?
