Breaking News

भारत गुलामगिरीत अद्यापही क्रमांक एक

कॅनबेरा, दि. 01 - भारताचा मानवी गुलामगिरीत क्रमांक आजही जगात अव्वल असल्याचा निष्कर्ष नुकताच प्रकाशित झाला असून भारतातील 18.35 दशलक्ष नागरिक अद्याप आधुनिक प्रकारच्या गुलामगिरीचे बळी ठरलेले आहेत. जगाच्या तुलनेत मानवी गुलामगिरीचे सर्वांधिक बळी भारतात असल्याचे उघड झाले आहे.
नुकताच ऑस्ट्रेलियास्थित मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या वॉकफ्री फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेला अभ्यासपूर्ण असा जागतिक गुलामगिरी निर्देशांकाचा (2016) अहवाल प्रकाशित करण्यात आला असून त्यात मानवी गुलामगिरीत भारत आघाडीवर असल्याचे
सिद्ध झाले आहे. जबरदस्तीने श्रम करायला लावणे, वेश्याव्यवसाय आणि भीक मागण्याच्या तीन प्रकारांच्या माध्यमातून या लोकांवर गुलामगिरी लादण्यात आलेली आहे. जागतिक गुलामगिरी निर्देशांकात नमूद करण्यात आल्याप्रमाणे आज जगभरात 45.8 दशलक्ष नागरिक गुलामगिरीत जगत असून त्यात बहुतांशी महिला आणि लहान मुलांचाच समावेश अधिक आहे.
2014 सालच्या निर्देशांकात जगातील गुलामगिरीचे प्रमाण 35.8 दशलक्ष होते. मानवी विकास आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत गुलामगिरीची अमानवी प्रथा कमी होण्याऐवजी वाढत असल्याकडेही या अहवालाने लक्ष्य वेधले आहे. दक्षिण कोरिया या देशात एकूण लोकसंख्येच्या 4.37 टक्के लोक गुलामगिरीच्या अवस्थेत जगतात. कारण दक्षिण कोरियन सरकारला हा प्रश्‍न व्यवस्थीत रीत्या हाताळता आलेला नाही. या निर्देशांकात 167 देशांचा अभ्यास करण्यात आलेला असून या एकूण गुलामांच्या संख्येपैकी 58 टक्के गुलाम केवळ पाच राष्ट्रांत आढळून आलेले आहेत. भारतानंतर या यादीत चीन, पाकिस्तान, बांगला देश, उझबेकिस्तानयांचा क्रमांक लागतो. आधुनिक पद्धतीत गुलामगिरीत व्यक्तीकडून तिच्या मनाविरुद्ध काम करायला भाग पाडले जाते. धमकी, हिंसाचार, उपाशी राखण्याचे प्रकार अशा कारणांचा धाक दाखवून त्यांना वाट्टेल ते व्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा समावेश या आधुनिक गुलामगिरीत होत असतो. या संशोधनात संशोधकांनी 42 हजार लोकांच्या 53 भाषांतील मुलाखती घेतलेल्या आहेत.
भारतातही सुमारे 15 हून अधिक घटकराज्यांत असा अभ्यास करण्यात आला असून भारतातील गुलामांत सर्वांधिक समावेश महिला आणि लहान मुलांचा आढळलेला आहे. जबरदस्तीचे श्रम लादणे अर्थात वेठबिगारी, वेश्याव्यवसाय आणि भीक मागण्याच्या मार्गांचा वापर भारतात या गुलामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.राजे-रजवाडे गेले तरी भारतात गुलामगिरीची लज्जास्पद प्रथा अद्यापही काय आहे हे सिद्ध करणारा हा अहवाल भारताच्या तथाकथित विकासाच्या वाटचालीचे वास्तव उघडे पाडतो हे मात्र निश्‍चित !