Breaking News

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड 30 मिनिटे चर्चा

मुंबई, दि. 09 -  आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या बंगल्यावर भेट घेतली. फडणवीस यांनी नीटबाबत राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका मांडली व त्यामुळे केंद्राने किमान यंदातरी महाराष्ट्रातील मुलांना नीटऐवजी राज्याच्या सीईटीद्वारेच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत राज ठाकरे त्यांचे आभार मानायला गेले होते. राज यांच्यासमवेत नीटच्या मुद्यांवरून लढा दिलेल्या काही पालकांचाही समावेश होता. राज आणि पालकांनी फडणवीस यांच्यासमवेत सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. यावेळी आगामी काळात महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका घेऊन राज्यातील मुलांवर अन्याय होणार नाही यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी विनंती राज यांनी फडणवीस यांना केली. यावर फडणवीस यांनी राज्य सरकार करीत उपाययोजनांबाबत राज व पालकांना माहिती दिली.
सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षेचे स्वरूप बदलणे, 11वी, 12 वीचा अभ्यासक्रम एकत्रित करणे व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शन, सूचना घेण्याचे सरकारने ठरविल्याचे फडणवीस यांनी राज यांना सांगितले. मात्र, यंदा 11 वी झालेले व 12वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा 2017 साली फटका बसणार असल्याचे राज यांनी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले. त्यावरही तोडगा काढला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मागील महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत यंदा नीटऐवजी 8 राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश राज्याच्या सीईटीनुसार घेण्यास हिरवा झेंडा दाखवला होता. याप्रकरणी राज यांनी नीटमुळे राज्यातील मुलांवर अन्याय कसा होतो यावर प्रकाशझोत टाकला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी मोदींची दिल्लीत भेट घेऊन नीटमुळे प्रादेशिक भाषेतील मुलांचे कसे नुकसान होते हे पटवून दिले होते. त्यानंतर केंद्राने अध्यादेश काढला होता.