Breaking News

दर महिन्याच्या 21 तारखेला राज्यातील शाळा-कॉलेजांमध्ये योगदिन

मुंबई, दि. 09 -  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच महाराष्ट्रात योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी यासाठी प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजरा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. 21 जून 2016 या दिवशी देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून त्याबाबत राज्यात योग दिन साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या विविध विभागांमार्फत जिल्हास्तरीय योग दिन समिती स्थापन करुन या समितीने त्या त्या जिल्ह्यामध्ये वर्षातून एकदा योग महोत्सव साजरा करण्याबाबतचा विचार व नियोजन करावे तसेच जिल्हास्तरीय समितीवर नियंत्रण करणारे राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतचे आदेशही तावडेंनी यावेळी दिले. त्यामुळे आता यानंतर दर महिन्यात शाळा, कॉलेजांमध्ये योगासने करून घेतली जाणार आहेत. राज्यात शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालये यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 40 हजार गावांपर्यंत योगाचा प्रचार करण्याचे काम या योग फेस्टीव्हलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. या बैठकीला भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती, राज्य योग असोसिएशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, कैवल्यधाम, समर्थ व्यायाम मंदिर आदी योगाचा प्रचार व प्रसार करणार्‍या राज्यभरातील संस्थाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.