Breaking News

येत्या 1 जुलैला ना.मुंडेच्या घरासमोर मुक्काम आंदोलन

शेवगाव (प्रतिनिधी) । 11 - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना शासकीयकर्मचार्‍यांचा दर्जा मिळून किमान वेतन व राहणीमान भत्ता मिळावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 1 ज़ुलै 2016 रोजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील घरासमोर मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष कॉ. अँड़ सुभाष लांडे यांनी दिला आहे. शेवगाव येथे काल बुधवारी (दि. 8 ) रोजी पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली, या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या
वेळी सुमारे 150 ग्रामपंचायत कर्मचारी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस अँड़ सुधीर टोकेकर, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, भगवान गायकवाड, संतोष लहासे, काकासाहेब निजवे, अशोक वाघमारे, आदी उपस्थित होते.
शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ व कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्यांसाठी येत्या 1 जुलै 2016 रोजी संघटनेतर्फे परळी येथे मुक्कामी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉ. लांडे यांनी जाहीर केले. या आंदोलनात राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले
आहे. कॉ. सुधीर टोकेकर यांनी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या लढ्याची माहिती सांगितली. संघटनेने काही बाबतीत यश मिळविले असले तरी शासनाच्या उदासीन भूमिकेने कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे तालुकाध्यक्ष
संजय डमाळ यांनी केले. आभार नितीन लांडे यांनी मानले.