Breaking News

माल्ल्याची तब्बल 1411 कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली, दि. 12 -  अंमलबजावणी संचालनालय अर्थाने ईडीने उद्योगपती विजय माल्ल्याची तब्बल 1411 कोटींची संपत्ती जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई केल्यामुळे माल्ल्यांना या कारवाईने मोठा दणका बसला आहे.
ईडीने आयडीबीआय बँक कर्ज प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगविरोधी कायद्यानुसार ही जप्तीची कारवाई केली आहे. माल्ल्याची विमान कंपनी किंगफिशर एयरलाईन्सने आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेतले आणि या प्रकरणात बँकेने त्याच्या विरोधात कर्जाबद्दल दिवाळखोरीची कारवाई केली होती. ईडीने शनिवारी माल्ल्याची बँकेतील जमा 34 कोटी रुपये, बंगळूर आणि मुंबई येथील दोन फ्लॅट, चेन्नई येथील 4.5 एकर औद्योगिक भूखंड, कुर्गमध्ये 27.75 एकर चहाची शेती, युबी सिटी येथील राहते घर आणि व्यावसायिक क्षेत्र तसेच बंगळूरमध्ये 8.4 लाख वर्ग फूट किंगफिशर टॉवर आदी मालमत्ता जप्त केली आहे.
माल्ल्याच्या विरोधात चेक बाऊन्ससारख्या प्रकरणात अटक वॉरंट प्रलंबित आहे तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातदेखील तो वॉन्टेड आहे. तपास संस्थेने आपला चौकशी अहवालाची स्थिती आणि तपासात माल्ल्याची उपस्थिती आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.
अधिका-याने सांगितले की, ईडीने मनी लॉन्ड्रिंग विरोधी न्यायालयात धाव घेतली होती त्या वेळी माल्ल्याच्या विरोधात एनबीडब्ल्यू जारी करण्यात आला होता. धनादेशाचा अनादर आणि कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची थकबाकी यासह विविध गुन्ह्यांमध्ये माल्ल्याविरोधात अनेक अटक वॉरंट प्रलंबित आहेत. न्यायालयाने या आधीच माल्ल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे तर इंटरपोलनेही त्यांच्या विरोधात रेड
कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी पावले उचलली आहेत. माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनेही त्याचा पासपोर्ट रद्द करून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारला विनंती केली आहे.