Breaking News

शिवसेना नंबर एकचा पक्ष आहे हे दाखवून द्याः खा.जाधव

चिखली, दि. 3 - येणा-या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत शिवसेना नंबर एकचा पक्ष असल्याचे विरोधकांना दाखवून द्यायचे असून त्यासाठी आतापासून सर्वांनी शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात नमूद केले आहे की, बुलडाणा, चिखली तालुक्यातील शिवसेनेचा नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार जनशिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी खा.जाधव बोलत होते. यावेळी आ.डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आ.विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जालिधंर बुधवत, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख राजेश देशमाने, संजय गायकवाड, संजय हाडे, जि.प.विरोधी पक्षनेते अशोक इंगळे यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीपबापू देशमुख, तालुकाप्रमुख अर्जुन दांडगे, अर्जुन नेमाडे, सुरेश वाळूकर, बळीराम मापारी, सतिष काळे, दादाराव खाडें, शेजराज पाटील यांच्यासह शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बुलडाणा, चिखली तालुक्यातील शिवसेना, युवासेना, किसानसेना नवनियुक्त पदाधिका-यांचा भगवा दुपट्टा घालून सत्कार करण्यात आला.
पूढे बोलतांना खा.जाधव म्हणाले, शिवसेना जिवंत माणसाची संघटना आहे व आंदोलन हा या संघटनेचा आत्मा आहे. जिथे अन्याय, अत्याचार, मदत तिथे शिवसेना प्रथम धावून जाते. हा शिवसेनेचा इतिहास आहे. परंतू अलिकडे शिवसैनिक आंदोलन विसरत चालले आहे. तेव्हा शिवसेनेचे पदे हे लग्नपत्रिकेत टाकण्यासाठी व मिरविण्यासाठी दिले नसून या पदांच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व व संघटनेची ताकद वाढविण्यासाठी दिले आहे. तेव्हा शिवसैनिकांनी शेतकरी, कष्टक-यांच्या ज्वलंत प्रश्‍नासाठी रस्त्यावर येवुन आंदोलन करावे, अशा सूचना खा.जाधव यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना दिल्या. कोणत्याही पक्षाची राजकीय ताकद ही निवडणुकीतील आकड्यावर मोजली जाते. तेव्हा शिवसेनेचे येणा-या प्रत्येक निवडणुकीतील आकडे नंबर एकचे असले पाहिजे असे कार्य करा असेही त्यांनी सांगितले. यावेळी वनिताताई वाघ यांची महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख म्हणून खा.जाधव यांनी घोषणा करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.