बाळासाहेब! आता तरी स्वाभिमान जागवाल का?
एका आंबेडकरवादी नेटकर्यांने (तो प्रथमदर्शनी तरी आंबेडकरवादी वाटतो म्हणून) एक सुंदर पोस्ट सोशल मिडियावर केली आहे. ती अशी -
“लोक म्हणतात जयभीम वाल्यांची संख्या भारतात कमी का आहे? त्यांना माझे ठळक उत्तर वाघांची संख्या जंगलात असो वा शहरात, कुठेही कमीच असते. कारण, वाघांची संख्या वाढली तर कुत्र्यांचा जीव धोक्यात येईल’’ आता या नेटकर्याच्या ठायी असलेला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा बाळासाहेब तथा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेतृत्वाने गहाण ठेवलाय काय?
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या वैचाीरिक बैठकीचा वारसा पुढे नेऊन स्वराज्य भारताची उभारणी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सतत ‘बाटगे’ म्हणून हिणविणार्या शेंडीवाद्यांच्या कट्टर समर्थकांना अलिकडच्या काळात विश्ववंदनीय महामानवाचा बराच पुळका आल्याचे दिसत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या एकुणच दिनचर्येत डॉ. बाबासाहेबांचा जप सुरू सल्याचे दिसते. रात्री झोपतांना मात्र याच आंबेडकरी चळवळीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन एकुणच बहुजन राष्ट्राला धर्मांध राष्ट्राकडे कसे घेऊन जायचे याचे स्वप्नरंजन सुरू असते.या चांडाळ चौकडीत सहभागी झालेले महाराष्ट्रातील काही नावे घ्यायची म्हटले तर आपल्या लेखनीच्या जीभेने ‘शुध्दीकरणवादी’ राष्ट्रवादाचा पुरस्कार करून बाबासाहेबांचा व्यक्तीस्वातंत्र्यवादी राष्ट्रवाद पायदळी तुडविणार्यांचे तळवे चाटणारे शेषराव मोरे आणि रमेश पतंगे यांचा अग्रहक्काने उल्लेख करावा लागेल. फाळणी आणि बाबासाहेब या लेखात डॉ. शेषराव मोरे यांनी तर ‘प्रकाश आंबेडकर आणि संघ’ या लेखात रमेश पतंगे नामक विद्वानांनी तोडलेले तारे वाचल्यानंतर बाबासाहेबांविषयी त्यांना असलेली आस्था ही संघप्रेमातून उफाळून आल्याचे स्पष्टपणे जाणवते. प्रश्न या संघाचे तळवे चाटणार्या बोरूबहाद्दरांनी उधळलेल्या अकलेचा नाहीच तर बाबासाहेबांचेच नाव पुढे करून, व्यक्तीस्वातंत्र्यवाद चिरडत वघा बहुजन समाजाला आर्थिक, सामाजिक आइण वैचारिक गुलामगिरीच्या दिशेने पुन्हा घेऊन जाण्यासाठी सुरू झालेल्या नतद्रष्ट प्रयत्नांचा आहे. स्पष्ट सांगायचे झाले तर 14 एप्रिलचे निमित्त साधून कुणा रमेश पतंगे नामक व्यक्तीने प्रकाश आंबेडकर आणि संघ या मथळ्याखाली आपल्या विचारांची मुक्त उधळण केली. छापून आले म्हणून फक्त विचारांची उधळण म्हणायचं एरवी त्यात वैचारिक उथळताच अधिक हा भाग वेगळा.
डॉ. बाबासाहेबांच्या आड लपून पतंगे यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर तोंडसुख घेतले आहे. तो त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यांचा भाग झाला. त्याविषयी हरकत नोंदविण्याचे कारण नाही पण या अभिव्यक्तिस्वातंत्र्यामागे असलेला सुप्त हेतू मात्र दुर्लक्षित करता येणार नाही. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असलेल्या अनेक रिपब्लिकन संघटना मराठा, ओबीसी आणि बहुजन संघटना आहेत, त्या सर्वांनीच संघ विचारसरणीला कडाडून विरोध केला आहे. मग 14 एप्रिलचे निमित्त साधून रमेश पतंगे यांना प्रकाश आंबेडकर यांनाच ‘लक्ष्य’ करण्याची सद्बुध्दी का सुचावी? उत्तर स्पष्ट आहे. दलितोध्दारासाठी डझनभर पक्ष आणि तितक्याच संघटना कार्यरत असल्या तरी बाबासाहेबांच्या रक्ताशी नाते सांगणारे प्रकाश आंबेडकर हे सावज टिपून थेट बाबासाहेबांवरच शरसंधान. इलाज होणार्या रोगांवर केमोथेरपीचा मारा का करायचा ही ब्राम्हणी शैली यामागे आहे. हे कसे नाकारता येईल. अॅड. प्रकाश आंबेडकरांवर तोंडसुख घेत असतांना त्यांच्या हातून न झालेल्या चुकांना प्रसिध्दी देऊन बाबासाहेबांच्या विचारसंस्काराचा कसा सपशेल पराभव झाला हेच जाणीवपूर्वक समाजासमोर ठेवण्याचा नतद्रष्ट हेतू या लेखातून डोकावतो आहे. प्रत्येक जण आपली विचारधारा पुढे नेण्यासाठी धडपडत असतो त्यात वावगे असे काही नाही. मात्र बहुसंख्य समाजाला मारक ठरणारी विचारधारा मुठभर टक्क्यांनी रेटण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतरही त्याला विरोध करण्याची हिम्मत दाखविली जात नसेल तर बाबासाहेबांच्या तत्वनथीतून बहुजन विचारधारेचा पराभव करण्यासाठी कुणा शेषराव किंवा रमेशरावांच्या बोरूची गरजच काय?
आज सोशल मिडीयावर बहुजन समाजाच्या महापुरूषांच्या विचारांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यातून बहुजन समाजातील तरूणांमध्ये जागृती होत आहे. स्वाभीमान उफाळून येतो आहे यातीलच एका नेटकर्यांने एक सुंदर पोस्ट शेअर केली. तो म्हणतो. “ लोक म्हणतात जयभीम वाल्यांची संख्या भारतात कमी का आहे? त्यांना माझे ठळक उत्तर वाघांची संख्या जंगलात असो वा शहरात, कुठेही कमीच असते. कारण वाघांची संख्या वाढली तर कुत्र्यांचा जीव धोक्यात येईल’’ सुंदर विचार आणि ते मांडण्याचे धाडस. पण हे धाडस केवळ सोशल मिडियाच्या चौकटीत का? सोशल मिडियावर अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करून वैचारिक प्रगल्भता सिद्द करण्याची हौस भागविता येईलही एक वेळ, पण बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्या विचारांचे अधिष्ठान जपणार्या बहुजनचळवळीच्या अस्तित्वालाच सुरूंग लावू पाहणार्या शुध्दीकरणाचा यज्ञ मांडणार्या गांडूळांची पिलावळ डोके वर काढीत आहे, त्याचे काय करणार? त्या नेटकर्याने निदान ती पोस्ट शेअर करून स्वाभीमान जपण्याचा थोडा तरी प्रयत्न केला. पण ज्यांच्यावर रमेश पतंगे यांनी तोंडसुख घेतले ते प्रकाश आंबेडकर स्थितप्रज्ञ का? नेटकर्याकडे असलेला स्वाभीमान बाळासाहेब आंबेडकरांच्या ठायी का दिसत नाही. चळवळीतील एकाही कोपर्यातून त्या दोन्ही विद्वान बोरू बहाद्दरांच्या लेखनीचा समाचार तर सोडा, निषेधाचा सुर घेणारा आवाज आला नाही मग सारा स्वाभीमान गहाण ठेवला गेला काय? महामानवाच्या विचारांना अशा प्रकारे सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहुन अवघा ओबीसी समाज व्यथित झाला आहे. त्याहीपेक्षा या नतद्रष्ट प्रयत्नांना कुणीच विरोध करीत नाहीत, अगदी बाबासाहेबांच्या नावावर मतांचा जोगवा मागत फिरणारे चळवळीचे पाईकही मुग गिळून बसलेत त्याचेच दुःख अधिक आहे. ओबीसी, बहुजन समाजातून निषेध होतो आहे. मग आंबेडकरवाद हाच वारसा सांगणारे आपले मौन कधी सोडणार हाच खरा प्रश्न आहे.
