Breaking News

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची सुटका नाही : केंद्र सरकार

नवी दिल्ली, दि. 21 - राजीव गांधीच्या सात मारेकर्‍यांना सोडण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी फेटाळला असून, सातही मारेकर्‍यांनी 20 वर्षाहून जास्त काळ कारागृहात शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांची शिक्षा माफ करण्याचा विचार तामिळनाडू सरकार करत आहे असे पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आले
होेते. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता त्यामुळे तामिळनाडू सरकारने केंद्राकडे विचारणा करत मत मागवले होते.
राजीव गांधीच्या मारेकर्‍यांची शिक्षा माफ करण्यात यावी यासाठी तामिळनाडू सरकारने दुसर्‍यांदा केंद्राकडून मत मागवले होेते. युपीए सरकार सत्तेत असताना फेब्रुवारी 2014 मध्ये पहिल पत्र पाठवण्यात आले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांना सोडण्याचा अधिकार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने तामिळनाडू सरकारला कळवले आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांना तामिळनाडूचे मुख्य सचिव के. ज्ञानदेसीकन यांनी यासंबंधी पत्र पाठवले होते. सातही आरोपींनी केलेल्या याचिकेवर तामिळनाडू सरकार विचार करत असून त्यांची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा विचार सरकार करत आहे. सर्व दोषींनी 24 वर्ष कारागृहात आपली शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना मुक्त करण्याचा सरकार विचार करत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी संथान, मुरुगन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.