औरगांबाद येथे 3 मे रोजी दुष्काळी उपाययोजनांसाठी किसान सभेचा मोर्चा
बीड, दि. 26 - राज्यात बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचा आरोप कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (उझख) पॉलिट ब्यूरो सदस्या खासदार वृंदा कारत यांनी केला. औरंगाबाद येथे तीन मे रोजी दुष्काळी उपाययोजनांसाठी किसान सभेचा मोर्चा निघणार आहे. या संदर्भात आढाव्यासाठी आलेल्या वृंदा कारत यांनी आज जिल्ह्यातील काही दुष्काळी भाग, तसेच चारा छावण्यांची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. सध्या असलेल्या छावण्यांत जनावरांची संख्या वाढल्याने चारा, पाणी अपुरे मिळत आहे. त्यामुळे छावण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जनावरांचा सांभाळ अशक्य असून, कर्ज फेडण्यासाठी शेतकर्यांना जनावरे कवडीमोल भावात विकावी लागत आहेत.पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू असले, तरी यातील बोटावर मोजण्याइतकेच टँकर शासकीय असून, उर्वरित मात्र खासगी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मनमानी केली जात आहे. पाण्याअभावी फळबागा तोडाव्या लागल्या आदी बाबी या पाहणीत समोर आल्याचे कारत म्हणाल्या.सध्या मनरेगाचे निकष मजुरांच्या दृष्टीने चुकीचे आहेत. कामाच्या बदल्यात मिळणारी मजुरी अपुरी असल्याचे त्या म्हणाल्या. मागच्या काही महिन्यांपासून रोहयोचे काम करणार्या मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.