Breaking News

संघमुक्त भारत आणि वास्तव !

भाजपची केंद्रात सत्ता येवून जवळपास दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होत आला आहे. भाजपाची सत्ता येताच मोदी सरकार हे सदसदविवेक बुध्दीचे देशाचा गाडा  हाकलतील, ही सर्वसामान्यांची अपेक्षा होती, अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारने आपली सदसदविवेक बुध्दी वापरण्याऐवजी संघाच्या इशार्‍यावर  कारभार चालू ठेवला, परिणामी देशात अराजक वातावरण निर्माण होवून, बेताल वक्तव्याची स्पर्धांच चालू झाली, ज्यातून दादरी प्रकरण, पुरस्कार वापसी, हैदराबाद  विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कैन्हय्या कुमार प्रकरण असेल, भारत माता की जय यावरून सुरू असलेले रणकंदन,  देशभक्त, देशद्रोह्याचे प्रमाणपत्र वाटण्याचा सपाटा जो भाजपाने चालवलेला होता, तो संघाच्या इशार्‍यावरच चाललेला असल्यामुळे, संघमुक्त भारताची गरज संबध देशाला  किती गरजेचे आहे, हे आता सर्वसामान्यांना पटू लागले आहे, पंरतू त्याला विधायक स्वरूप देण्याचे, व्यापक लढा उभारण्याचे अल्पसे प्रयत्न झाले, मात्र शनिवारी संयुक्त  जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची मातृसंघटना असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवत, देशाला संघाला  तावडीतून मुक्त करण्यासाठी भाजपेतर पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन केले, त्यामुळेच संघमुक्त भारताचे स्वप्न साकार होवू शकते, त्यासाठी भाजपेतर पक्षांनी  एकत्र मोट बांधण्याची गरज आता प्रादेशिक पक्षांना वाटू लागली आहे. आजची ही लढाई केवळ राजकीय नसून ही लढाई, मानवी हक्काची गळचेपी करू पाहणार्‍या  विरूद्धची आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला छेद देत, संविधानाला निकाली काढण्याचा प्रयत्न करत, संघाची भूमिका म्हणजे, ह्या देशाची भूमिका आहे, असा आव  आणण्याचा जो केविळवाणा प्रयत्न, अतिरेक जो संघाकडून सत्तेवर येताच सुरू झाला आहे, त्याचा शेवट हा होणारच, पण तो केव्हा होईल हा प्रश्‍न आहे. त्यामुळेच  नितीशकुमारांनी देशाला भाजपमुक्त आणि संघमुक्त करण्यासाठी भाजपव्यतिरिक्त सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. देशातील सर्व पक्ष एकत्र  आल्यास भाजपचा सफाया करता येईल. यासाठी आपण अगोदरच काही पावले उचलली आहेत, मात्र त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत महाआघाडीची स्थापना करावी,  असे सुचवत आपण कोणत्याही पक्षाविरोधात नाही. मात्र देशाचे विभाजन करणाऱया विचारसरणीविरोधात आपण आहोत, असे स्पष्ट संकेत देत त्यांनी संघमुक्तीसाठी  आघाडी उघडली आहे.  त्यासाठीच या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी नीतीशकुमार सरसावले आहेत. त्यांनी बिहार राज्यात कायदा व सुव्यवस्थेची घडीचा जम चांगलाच  बसवला आहे, उत्कृष्ठ प्रशासक, पारदर्शक प्रशासक देण्यात ते यशस्वी झाले आहेत, त्यामुळेच संघमुक्त भारतचा त्यांनी दिलेला इशारा, संघाला झोंबला नसता तरच  नवल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये याचा प्रभावीपणे वापर  करण्यात आला होता. अर्थात त्यावेळी अनेक प्रादेशिक पक्षांनी एकत्र न येता स्वबळावर निवडणूका लढविल्या होत्या, त्यामुळेच भाजपाला सत्ता काबीज करणे सोपे  झाले होते. त्यामुळेच येणार्‍या 2019 च्या लोकसभा निवडणूकांसाठी नितीशकुमारांनी संघमुक्त भारतची हाक दिली आहे. त्याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे  औत्सुक्याचे ठरेल?