ईडीच्या छाप्यात आढळला कीर्ती चिदंबरमकडे कुबेराचा खजिना
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 01 - ईडीच्या छाप्यात आढळला माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कीर्ती चिदमंबरम यांच्याकडे कोटींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक तसंच जगभरात केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे त्यांनी ही मालमत्ता उभी केली आहे. एअरसेल - मॅक्सिस घोटाळ्याच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचलनालय आणि आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती उघड झाली आहे.
डेली पायोनिअरने दिलेल्या माहितीनुसार कीर्ती चिदंबरम यांनी 14 देशांमध्ये आपली संपत्ती जमा केली असून सर्व ठिकाणी त्यांचे व्यवसाय सुरु आहेत. यामध्ये लंडन, दुबई, दक्षिण अफ्रिका, फिलिपिन्स, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, फ्रान्स, अमेरिका, स्विझर्लेंड, ग्रीस आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. कीर्ती चिदंबरम यांनी 2006 ते 2014 दरम्यान केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे ही संपत्ती जमा केली आहे. महत्वाचे म्हणजे यादरम्यान पी चिदंबरम यांच्याकडे गृहमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती. तपास यंत्रणा 14 देशांना संपर्क साधून यासंबंधी माहिती मागवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दहशतवादी संघटनेशी चिदंबरम यांचे संबंध
भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेशी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे काही संबंध आहेत का हे तपासणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने 2009मध्ये गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँ या महिला दहशतवाद्यासंदर्भात दाखल केलेल्या शपथपत्रातील वादग्रस्त बदल तत्कालीन चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची माहिती तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्ले यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना स्वामी म्हणाले, गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय काही फाईल्सची सखोल चौकशी करत आहे. भारतीय दंड संहितेनुसार हा गंभीर गुन्हा असून खोटी माहिती दिल्याबद्दल चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. तसेच चिदंबरम यांचे ‘लष्कर-ए-तैयबा’शी काही संबंध आहेत का हे देखील नार्को चाचणी घेऊन तपासणे आवश्यक आहे.