मुझफ्फरपूर लष्कर भरती उमदेवारांनी दिली अंडरवेअरवर परीक्षा
मुझफ्फरपूर/वृत्तसंस्था । 01 - तुम्ही लष्कर वा पोलिसांच्या भरती परीक्षेदरम्यान उमेदवारांना हाफ पँटमध्ये मध्ये धावताना अनेक वेळा पाहिले असेल, पण लष्कराच्या परीक्षेदरम्यान बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. केवळ अंतर्वस्त्र घालून हे उमेदवार परीक्षा देत होते, परीक्षेदरम्यान कोणीही चीटिंग अथवा कॉपी करू नये यासाठी लष्करातर्फेच हा धक्कादायक आदेश देण्यात आला होता.मुझफ्फरपूरमध्ये रविवारी लष्करात क्लार्क भरती करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेसाठी सुमारे 1150 उमेदवार बसले होते. मात्र परीक्षा केंद्रावर सर्व उमदेवारांना अंतर्वस्त्र वगळता अंगावरील सर्व कपडे काढून तशीच परीक्षा देण्याचा आदेश लष्कराच्या अधिकार्यांतर्फे देण्यात आला. परीक्षेच्या तणावात असलेल्या सर्व उमेदवारांना या आदेशामुळे धक्काच बसला. अनेक उमदेवार गेल्या वेळी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळले होते, यावेळेस त्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व कोणीही कॉपी करू नये यासाठीच असा आदेश दिल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. सर्व उमदेवारांना या आदेशामुळे खुल्या मैदानात अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर बसून उत्तरपत्रिका लिहावी लागली.