आदेश डावलून मंचावर फटाके लावले, दुर्लक्षामुळेच मेक इन इंडिया सप्ताहात आग
मुंबई, प्रतिनिधी, दि. 17 - मंचावर फायर क्रॅकर आणि कलरफुल फ्लेम्स यांचा वापर करण्यात येऊ नये, अशी सूचना मुंबई अग्निशमन दलाने दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करत आयोजकांनी महाराष्ट्र रजनी कार्यक्रमावेळी व्यासपीठावर मुक्तपणे फायर क्रॅकरचा वापर केला होता. तेच क्रॅकर रविवारी गिरगाव चौपाटीवर रविवारी लागलेल्या आगीचे मुख्य कारण असल्याची माहिती आता पुढे येत आहे.
गिरगाव चौपाटी ही कलेक्टर लँड आहे, त्यामुळे महापालिकेने तेथे व्यासपीठ उभारण्यास परवानगी देण्याचा प्रश्न नव्हता. मात्र महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या आयोजकांनी या व्यासपीठाचे मुंबई अग्निशमन दलाकरवी फायर ऑडिट करवून घेतले होते. ना हरकत वेळी अग्निशमन दलाने घातलेल्या अटींमध्ये फायर क्रॅकर आणि कागदाचे तुकडे उडवणारे कलरफुल फ्लेम्स वापरले जाऊ नयेत, असे स्पष्टपणे बजावण्यात आले होते. मात्र आयोजकांनी या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आग भडकण्यास हेच कारण कारणीभूत ठरले. व्यासपीठावर एलपीजी सिलिंडर होते. त्यावर ठिणगी पडून स्फोट झाला आणि काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. व्यासपीठ बनवण्यासाठी अत्यंत ज्वलनशील असे लाकडी आणि कापडी सामान वापरण्यात आले होते. त्यामुळेसुद्धा आगीची व्याप्ती वाढली, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली. व्हीव्हीआयपींचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात अग्निसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित होती, मात्र त्यात ढिसाळपणा झाल्याचे उघड होत आहे.