वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचार्यांना प्रवाशांची भीती वाटतेय..
मुंबई, प्रतिनिधी, दि. 17 - गेले काही दिवस मध्य तसेच पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने उपनगरीय वेळापत्रक दर दिवशी कोलमडून पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून संतप्त प्रवाशांच्या संतापाचा कडेलोटही वारंवार होऊ लागला आहे.
या कडेलोटामुळेच रेल्वेच्या कर्मचार्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत स्टेशन अधीक्षक, रेल्वे तिकीट तपासनीस किंवा मोटरमन वा गार्ड यांना प्रवाशांनी घेराव घालण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रेल्वेचे कर्मचारी दडपणाखाली काम करत असल्याचे सांगतात. मुंबई उपनगरीय सेवेवर मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर जवळजवळ दर दिवशी काही ना काही तांत्रिक बिघाडामुळे गाडया किमान 10 ते 15 मिनिटे उशिरानेच धावत असतात. त्यामुळे गेले काही दिवस प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. उशिराने धावणार्या गाड्यांमुळे गर्दीत वाढ होत असून काही वेळा ही गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होत असून काही ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून रेल्वे रोको करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण त्या पलीकडे जाऊन रेल्वे कर्मचार्यांना घेराव घालण्याच्या अथवा प्रसंगी तोडफोड करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. स्टेशन अधीक्षक, तिकीट खिडकीवरील कर्मचारी, मोटरमन, गार्ड आणि तिकीट तपासनीस हे प्रवाशांच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांच्यावर प्रवाशांचा सर्व रोष निघतो. गेल्या काही दिवसांमध्ये चेंबूर, गुरू तेगबहाद्दूर नगर, विलेपाल्रे, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी ठिकाणी तिकीट तपासनीस, स्टेशन अधीक्षक आणि मोटरमन यांच्याबरोबर प्रवाशांनी हुज्जत घातल्याच्या, जमाव जमवून त्यांना धाकदपटशा करण्याच्या घटना घडल्या. यांपकी चेंबूर येथे घडलेल्या घटनेत संबंधित मुलीकडे अधिकृत तिकीट नसतानाही तिच्या पालकांनी तिक
ीट तपासनीसांवर दबाव आणत, त्यांच्यावर चोरीचा आळ घेत या प्रकरणाला गंभीर वळण दिले. त्याचप्रमाणे गेल्या आठवडयात चेन्नई एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या एका तरुण उपनगरीय प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली असता त्याच्या पालकांनीही संबंधित अधिकार्याला दामटवण्याचा प्रकार घडला होता. गाडी दिरंगाईने चालणे किंवा यंत्रणेत बिघाड होणे, यासाठी अनेक तांत्रिक गोष्टी कारणीभूत असतात.
अनेकदा तर काही व्यसनाधीन तरुण सिग्नलच्या वायर कापतात, त्यामुळेही तांत्रिक बिघाड होतात. मुंबईसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि प्रचंड व्यग्र ठिकाणी देखभाल दुरुस्तीसाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे हे बिघाड होतात. मात्र, प्रवाशांनी कोणत्याही कारणासाठी थेट रेल्वे कर्मचार्यांवर दबाव आणणे चूक आहे, अशी भूमिका
मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी घेतली.