Breaking News

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुजी प्रतिष्ठानची सातार्‍यात निदर्शने

सातारा, 22 -  मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप मिळण्याबाबत संबंधित महाविद्यालये व समाजकल्याण विभागाकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ गुरुजी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले.
गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश माने यांच्या नेतृत्वाखाली विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणार्‍या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हटले आहे, की समाजकल्याण विभाग आणि महाविद्यालयांकडे वारंवार लेखी तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. राज्यात 55 हजार कोंटीचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनात येत असून त्याची झळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बसत आहे. पालकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कारवाई करावी. अन्यथा विद्यार्थ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. 
आंदोलनात रुपेश माने यांच्यासमवेत विविध महाविद्यालयांतील विकी सोनवणे, कीर्ती जगताप, कोमल जमदाडे, महेश कुंभार, कोमल बनकर, अनिकेत कर्णे, संध्या वाघ, साफिया मुलाणी, प्रियांका देवकाते, समीर खराडे, अमृता दळवी यांच्यासह 28 विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.