Breaking News

सातारा जिल्ह्यातील उजाड डोंगर हरित करण्याचा ध्यास

सातारा, 10 (रघुनाथ कुंभार) - सातारा जिल्ह्यातील पर्जन्यमान वाढावे तसेचा तापमानवाढ टाळण्याच्या हेतूने सातारा जिल्ह्यातील उजाड डोंगरावर कमी पाण्यावर वाढणार्‍या वनस्पतींची लागवड करून डोंगरावर हिरवळ बनविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कृषि विभाग व वन विभागाकडून काही ठोस निर्णय घेऊन प्रयोग करण्यात येणार असल्याची चर्चा प्रशासकिय इमारतीमधील बळीराजा सभागृहात झाली. चर्चेमध्ये जिल्हा कृषि अधीक्षक जितेंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह वन विभागाचे अधिकारी तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याबरोबर भूजल पातळी उंचावण्यासाठी विंधन विहिरी पाडण्यासह विहिरींच्या पाणी उपशावर मर्यादा घालायच्या का याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या बंधार्‍यांच्या दुरुस्तीच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भूजल पातळीत वाढ होण्यासाठी जमीनीवर हिरवळीचे गवत लावण्याचा प्रयोग करणे तसेच त्या-त्या तालुक्यातील तहसिलदारांच्या मार्फत जिल्ह्यातील उजाड  डोंगरावर कमी पाण्यात तग धरून राहणार्‍या झाडांची लागवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी बियाण्यांच्या टोकण्याचा कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. बियाणे गोळा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच परिसरातील प्रक्रिया उद्योगांची मदत घेण्याबाबतचा पर्याय सुलभ असल्याने त्याचा वापर करण्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, या कामासाठी कोणताही शासकिय निधी थेट खर्च करण्याबाबत अध्यापही तरतुद नसल्याने ही योजना शासकिय अधिकारी तसेच सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयांच्या सहकार्याने राबविणे गरजेचे असल्याचे निश्‍चित करण्यात आले. 
दरम्यान, सातारा शहराच्या शेजारी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षारोपण तसेच किल्ल्यावर केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा पत्रकार तसेच शासकिय अधिकार्‍यांनी दाखला देत अशी विकासात्मक कामे होण्याची गरत असल्याचे मत मांडले. तसेच अजिंक्यतारा किल्ल्यावर सुरु असलेल्या कामांमध्ये कोणत्याही यंत्रणेने ढवळा-ढवळ न करता ती कामे करत आहेत, त्यांनाच करू द्यावीत, ज्यांना कोणाला तशी कामे करावयाची आहेत, त्यांनी परिसरातील दुसरा डोंगर शोधून त्यावर विकास कामे करावी, असे सुचवून कोणत्याही कामात श्रेयवादाचे राजकारण येवू नये , असे सुचविण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी या योजनेला जिल्ह्यातील जनतेकडून प्रतिसाद मिळावा यासाठी प्रसिध्दीचे काम करण्याची ग्वाही दिली. शासकिय अधिकारी आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी एकत्र आल्यास या योजनेला चांगले यश मिळेल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.