सातारा जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक प्रत्येक शुक्रवारी
सातारा, 10 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक शनिवारऐवजी आता शुक्रवारी घेण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. या निर्णयामुळे बँकेकडे मंजुरीला आलेली कर्जप्रकरणे निकालात निघण्यास मदत होणार आहे.
जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीला कर्जमंजुरीचा अधिकार आहे. मध्यंतरी बँकेचे संचालक आ. जयकुमार गोरे यांनी यावरुनच उपोषण करुन कर्जमंजुरी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्याची मागणी केली होती, पण विभागीय सहनिबंधकांचा निर्णय व बँकेने केलेला ठराव यापुढे गोरंच्या मागणीचा विचार झालेला नाही पण कार्यकारी समितीची बैठक प्रत्येक शनिवारी होत होती. दुसर्या व चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी येत होती. त्यामुळे कर्ज प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी महिन्यातील दोनच शनिवार मिळत होते. याचा कर्ज प्रकरणे मंजुरीच्या वेगावर परिणाम झाला होता.
बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकारी समितीची बैठक आता प्रत्येक शुक्रवारी होईल असा निर्णय घेतला आहे. त्यास संचालक मंडळाचीही मान्यता घेतली. याची अंमलबजावणी मार्चपासून होण्याची शक्यता आहे.