केंद्राची समिती आल्याने सातारा जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट
सातारा, प्रतिनिधी 17 - पंचायत राज सशक्तीकरण अभियानात राज्यामध्ये सातारा जिल्हा परिषद नंबर वन ठरली आहे. देश पातळीवरील स्पर्धेत सातारा जिल्हा परिषद उतरली आहे. सातारा जिल्हा परिषदेची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात केंद्राची समिती आली असून त्यामुळेच जिल्हा परिषद प्रशासनाने धावपळ सुरु ठेवली आहे. दि. 22 ते 24 पर्यंत सातारा जिल्हा परिषदेची पाहणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेने पंचायत राज सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील खराडेवाडी आणि कराड पंचायत समितीचे नाव झळकले. केंद्राने नेमलेली समितीचे आगमन सातारा जिल्ह्यात झाले असून या समितीमध्ये मध्यप्रदेश येथील महिला चेतना मंचच्या निर्मला भूच या असून त्यांनी फलटण तालुक्यातील खराडेवाडी या गावाला भेट दिली. गावामध्ये शासनाने जिआर, माहिती कशा पध्दतीने दिली जाते. प्रशासन गावचा कारभार कसे राबवते, याची पाहणी करणार आहे. दरम्यान, दि. 17 व 18 रोजी कराड पंचायत समितीची पाहणी करणार आहेत. कराड पंचायत समितीची पाहणी केल्यानंतर समिती दि. 22, 23 आणि 24 असे तीन दिवस कमिटी पाहणी करणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, पाणी पुरवठा, महिला बालकल्याण आधी विभागात लगबग सुरु आहे.