राधिका रोडवरील अतिक्रमण करणार्या 7 व्यापार्यांवर कारवाई
सातारा, प्रतिनिधी 17 - सातारा नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आक्रमक झाला असून या विभागाने राधिका रोडवर अतिक्रमण केलेल्या 7 व्यापार्यांवर कारवाई करत वजनकाटे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या व्यापार्यांनी नगरपालिकेत गोंधळ घातला. अखेर उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली.
राधिका रोडवर सातारा शेती उत्पन्न बाजार समिती शेजारच्या जागेवर पहाटे 6 ते 10 या वेळेत काही व्यापारी व्यवसाय करतात. बाहेरच माल मिळत असल्याने ग्राहक मंडईत येत नाहीत. त्यामुळे प्रामाणिकपणे मंडईत बसून विक्री करणार्या शेतकर्यांच्या मालाची विक्री होत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी बाहेरील व्यापारी हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने राधिका रस्त्याला भेट देवून अशा प्रकारे व्यवसाय करणार्या 7 व्यापार्यांवर कारवाई केली. त्याचवेळी व्यापार्यांचे वजनकाटे जप्त करून दंडात्मक कारवाई केली. या प्रकारामुळे राधिका रोड परिसरात तणावाचे वातावरण होते. यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेत संतप्त विक्रेते दाखल झाले. त्यांनी मुख्याधिकार्यांच्या दालनासमोर गोंधळ घातला. दरम्यान, उपगनराध्यक्ष जयवंत भोसले यांनी त्यांची समजूत घातली.
त्यावेळी व्यापारी म्हणाले, कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे गरजेचे असते. याबाबत पालिकेकडून कोणत्याही प्रकारची नोटीीस न देता कारवाई केली. मंडईमध्ये बसू देत नसल्यामुळे व्यापारी रस्त्यावर व्यवसाय करतात. मात्र, त्यांना तेथून हाकलण्यात येते. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर भोसले म्हणाले यांनी तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता ते अतिक्रमण असून तुम्हाला काँग्रेस कमिटीशेजारची मोकळी जागा व्यवसायासाठी देण्यात येईल. याबाबत मुख्याधिकार्यांशी चर्चा केली असून दोन दिवसात सोयी पुरवल्या जातील. दरम्यान, गोंधळ झाल्यानंतर व्यापार्यांचे वजनकाटे परत करण्यात आले.