Breaking News

परभणीत व्यापार्‍यांचा कडकडीत बंद

परभणी, 22 - परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने स्थानिक संस्था करवसुलीसाठी महापालिकेने नियुक्त केलेली एजन्सी रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी  सकाळी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून महापालिकेवर मोर्चा काढला. 
 महापालिका, शहरातील व्यापारी यांच्यात एलबीटी वसुलीबाबत वाद सुरू आहे. महापालिकेने वसुलीसाठी नियुक्त केलेली एजन्सी व्यापार्‍यांना वेठीस धरीत असून, वारंवार वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करीत आहे. व्यापार्‍यांनी अनेक वेळा खेट्या मारल्यानंतरही चहापान, पेट्रोल, स्टेशनरी आदी किरकोळ बाबींची देयके सादर करण्यासाठी तगादा लावला जात आहे. जर व्यापारी उपस्थित राहिला नाही तर एकतर्फी कारवाई करीत अवास्तव रकमेच्या डिमांड नोटिसा पाठवल्या जात आहेत. या निर्णयाच्या विरोधात अपील करावयाचे असल्यास ती रक्कम भरल्याशिवाय अपील करता येत नसल्यामुळे व्यापारी अडचणीत सापडला असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. 
महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्याशी चर्चेतूनही मार्ग न निघाल्यामुळे व्यापारी महासंघाने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सचिन अंबिलवादे यांनी महापौर संगीता वडकर यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त राहुल रेखावार, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, विधी व न्याय सभापती सुनील देशमुख यांची उपस्थिती होती.