Breaking News

घोसपुरी येथील पवन ऊर्जा प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध

 अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात पुण्याच्या कंपनीकडून उभारण्यात येत असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पास ग्रामस्थ व शेतकर्यांनी विरोध दर्शविला आहे. या कंपनीकडून शेतकर्यांची दिशाभूल करून जमिनी लुबाडण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घोसपुरीचे उपसरपंच प्रभाकर घोडके यांच्या नेतृत्वाखाली अशोक हंडोरे, सिकंदर तांबोळी, विठ्ठल हंडोरे, पोपट झरेकर, विलास झरेकर, नूरमहंमद शेख, कैलास कवडे, अप्पा कवडे,  बाळासाहेब इधाते, नानासाहेब गाढवे, नवनाथ झरेकर, बबन झरेकर, पद्माकर झरेकर आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
यामध्ये म्हटले आहे की, पुणे येथील अनंत इलेक्ट्रीकल्स या कंपनीच्या वतीने घोसपुरी गावच्या शिवारात पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या सुपिक जमिनी दिशाभूल करीत, तसेच प्रसंगी दमदाटी करीत लुबाडण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे. गोरगरिब शेतकर्यांना भूमिहीन करण्याचा कंपनीने प्रयत्न चालवला आहे. याबाबत नुकताच झालेल्या ग्रामसभेत अनेक शेतकर्यांनी कंपनीच्या या दांडगाईबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच आपल्या जमिनी देण्यासही विरोध दर्शविलेला आहे. त्यामुळे ग्रामसभेने सदर प्रकल्पास विरोध दर्शविण्याचा ठरावही केलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर कंपनीवर कारवाई करीत हा प्रकल्प रद्द करावा व गोरगरीब शेतकर्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे, अशी मागणी घोसपुरी ग्रामस्थांनी या निवेदनात केली आहे.