Breaking News

विद्यार्थ्यांच्या निवडक शोध निबंधकाचे प्रकाशन

 अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - जागतिकीकरणापूर्वी व त्यानंतर मानवी हक्काच्या परिणामात प्रचंड घडामोडी झाल्या असून राष्ट्रीय स्तरावरील हक्कांना वेगळ्या दृष्टीकोनातून जागतिक पातळीच्या चौकटीत पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या परिस्थितीत हक्कासाठी लढावेच लागते. अनेक राष्ट्रांत मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याने देशांतर्गत समस्या वाढल्या असल्याचे मुंबईच्या डॉ.अरुणा पेंडसे यांनी सांगितले.
अ.नगर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व युजीसी दिल्ली च्या सहकार्याने ‘मानवी हक्कावर जागतिकीकरणाचा झालेला परिणाम’ याविषयावर आयोजित  राष्ट्रीय कार्यशाळेत  पेंडसे बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, डॉ.दुर्गाकांत चौधरी, डॉ.महेश रंजन देबटा, सुनील कवडे व मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला डॉ.भा.पा.हिवाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मानवी हक्कावर जागतिकीकरणाचा झालेला परिणाम या विषयावरील देशातील प्राध्यापक व विध्यार्थ्यांच्या निवडक शोधनिबंध  पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पेंडसे म्हणाल्या की, मानवी हक्कांची जाणीव एका राष्ट्रापूरती मर्यादित न राहता जागतिक पातळीवर याचा विचार होणे गरजेचे आहे. देशादेशातील कायदे हक्क याबरोबरच यासाठी स्वयंसेवी संस्थांचे योगदान व त्यांच्या सूचनांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले की, बदलत्या काळाचा,विचारांचा मागोवा घेणे, त्यानुसार विविध प्रोत्साहनपर उपक्रम राबविणे यासाठी महाविद्यालयाचे सतत प्रोत्साहन राहील. याकामी युजीसीचे मिळणारे सहकार्य व प्राध्यापकांचा मोलाचा सहभाग नेहमीच मिळतो त्या बद्दल समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविकात प्रा.सुनील कवडे यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. जागतिकीकरणात एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर अंकुश ठेवण्याच्या स्पर्धेत मानवी हक्कांना विसरत चालले आहेत. दहशतवाद, पलायनवाद, सीमावाद बरोबरच महिला, बाल कामगारांचे प्रश्‍न व पर्यावरणविषयीचे प्रश्‍न वाढत असून पर्यायाने निर्माण झालेले गंभीर प्रश्‍न मानवी हक्कांनाच आव्हान देत आहेत. यावर कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन होईल. यावेळी डॉ. एस. बी. अय्यर, प्रा.फिरोज शेख, प्रा. डी.बी.मोरे, प्रा.भास्कर कसोटे, प्रा. पूनम घोडके, व मान्यवर उपस्थित होते.  सूत्रसंचालन डोझो व लिकी यांनी केले तर आभार प्रा. विलास नाबदे यांनी मानले.