Breaking News

मानवी मुल्यांची गळचेपी !

देशातील आजची परिस्थितीचे अवलोकन केले तर आपली मार्गक्रमणा कुठे चालली आहे? हा प्रश्‍न पडतो. असहिष्णुता या मुद्दयावरून अनेक चर्चा वाद विवाद झडले परंतू त्यातून कोणतेही मन्वंतर घडून आले नाही. कुठेतरी आपल्या मानवी हक्कांची,मुल्यांची गळचेपी होत आहे, यांची बोचणी आपल्या सर्वांना होत असते,मात्र त्याचे प्रगटीकरण काही लोकांकडूनच होते. परवाच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संसदेवर हल्ला केल्याबद्दल फाशी देण्यात आलेला अफजल गुरू याच्या फाशीच्या विरोधात त्याच्या मृत्यूदिनीच एक कार्यक्रम आयोजित करून देशविरोधी घोषणा देणार्‍या अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र याच देशातील नागरिक, विद्यार्थी अशी भूमिका कशी घेवू शकतात. हा महत्वाचा प्रश्‍न आहे.त्यांनी अशी भूमिका का घेतली ? त्यांना असा पुळका का यावा ? याची चिकित्सा होण्याची गरज आहे. देशविघातक कृत्याला कोण खतपाणी घालत आहे? यावर चिंतन होणे गरजेचे आहे.   धर्मनिरपेक्षतेवरून आपण फारकत तर घेतली नाही ना? असा प्रश्‍न निर्माण होतो.  हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण असेल, आज आपण आपली वैचारिक शक्ती तर हरवून बसलो नाही ना असा प्रश्‍न पडतो. अन्न वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा बरोबरच विचारांचे स्वातंत्र, सन्मानाने जगण्याचे स्वतंत्र आपण कुठे तरी हरवत तर नाही ना चाललो, अशी शंका वाटायला लागते. संयुक्त राष्ट्राकडून याकडे लक्ष वेधून आंतरराष्ट्रिय मानव अधिकारावर सर्वाधिक चिंता प्रकट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने घेतलेल्या आढाव्यात जगभरातील कोणताही माणूस प्रगतिच्या पथावर मागे सुटता कामा नये, असे सांगुन 2030 पर्यंत जगातील कोणतही व्यक्ती बेघर राहायला नको. त्याचप्रमाणे जगभरात वेगवेगळ्या नावाखाली मानव समाजात हिंसाचाराचा जो प्रकार होत आहे. त्यावरही त्या-त्या देशातील सरकारांनी सक्त पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आले आहे. तर आपल्याकडेही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील काही दिवसांपूर्वी देशातील परिस्थितीवर चिंता प्रकट केली होती. देशाला लाभलेल्या आजपर्यंत एकाही राष्ट्रपतीने अशा प्रकारची चिंता प्रकट केलेली नाही यावरुन विद्यमान सत्ताव्यवस्थेच्या काळात भारतीय मानव समाजाची परिस्थिती नेमकी काय आहे यावर शिक्कामोर्तब होतो. देशातील बहुलतावाद कायम राहावा यासाठी आव्हान केले आहे. देशात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनाक्रमातून निर्माण होणार्‍या परिस्थितीत मानव समुदाय भीतीच्या छत्रछायेखाली वावरतांना दिसत आहे. देशाची परिस्थिती पाहिल्यास सामाजिक, धार्मिक, जातीय तणाव निर्माण केला जात असुन माणसाच्या मुलभूत गरजा असलेल्या प्रश्‍नांवर साधी चर्चाही घडविली जावू नये यासाठी यंत्रणाच कार्यरत असल्याचे यातून संशय निर्माण होतो. कोणत्याही सुजाण नागरीकाला आज देशाच्या परिस्थितीवर गंभीर चिंता करावीशी वाटते आहे. एका बाजूला जनता आणि शासन व्यवस्था यांच्या संबंधाबाबत चांगले भासवत राहाण्याचा प्रकार प्रसारमाध्यमांतून अवलंबला जात आहे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र मानवी समुहाच्या एकूणच विरोधातील दिसून येत आहे. शासन व्यवस्था ही राजकीय व्यवस्थेतून येत असली तरी जनतेशी तिचा अन्योन्य संबंध असतो, हे मात्र केव्हाही विसरता कामा नये.