Breaking News

सैनिक स्कूलच्या ट्रस्टींच्या विरोधात संरक्षण मंत्र्यांकडे तक्रार करणार

सातारा, 10 -  सैनिक स्कूलचे प्राचार्य व रजिस्ट्रार हे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांचे आदेश धुडकावून लावत प्रायमरी सैनिक स्कूल गिळंकृत करु पाहत आहेत. खासदार उदयनराजे भोसले व मी स्वत: क्रेंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी आग्रही आहोत. यामुळेच भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या ट्रस्टींच्या विरोधात आम्ही क्रेंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे संबंधितांना बडतर्फ करण्याची मागणी केल्याची माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिली.
डॉ. येळगावकर म्हणाले किंडर गार्डन ही प्रायमरी सैनिक स्कूलची इमारत ही सर्व्हे क्रमांक 409-3 या शासकीय भूखंडावर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने तत्कालीन संचालकांनी लोकवर्गणीद्वारा उभी केली. येथे के. जी. ते इयत्ता पाचवीपर्यत वर्ग सुरु आहेत. नैसर्गिक वाढीने हे वर्ग इयत्ता दहावीपर्यंत करता आले असते. मात्र तत्कालीन संचालकांनी असे केले नाही. संस्थेच्या निधीचा वापर दोन विश्‍वस्तांनी संस्थेच्या हितासाठी न करता सैनिक स्कूलसाठी केला. त्यामुळे किंडर गार्डनचे आर्थिक नुकसान झाले. त्याची चौकशी होणे उचित वाटते असे सहायक धर्मादाय आयुक्तांचे न्यासाची तपासणी करण्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. सध्याच्या जिल्हाधिकार्‍यांना आम्ही शाळेचे केंद्रीय विद्यालयात रुपांतर करावे, अशी मागणी केली आहे. त्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे. बेजबाबदार विश्‍वस्तांना बडतर्फ करावे यासाठी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे मागणी केल्याचे डॉ. येळगावकर यांनी नमूद केले. यावेळी रमेश जाधव, पोपटराव खामकर आदी उपस्थित होते.